भारनियमनाचा पुराडा परिसराला फटका
By Admin | Updated: May 15, 2017 01:30 IST2017-05-15T01:30:17+5:302017-05-15T01:30:17+5:30
कुरखेडा तालुक्यातील पुराडा परिसरातील शेकडो हेक्टरवरील धान पीक पाण्याअभावी करपले आहे.

भारनियमनाचा पुराडा परिसराला फटका
पुराडा : कुरखेडा तालुक्यातील पुराडा परिसरातील शेकडो हेक्टरवरील धान पीक पाण्याअभावी करपले आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. असे शेतकरी उन्हाळी धान पिकाची लागवड करतात. अनेक शेतकऱ्यांनी नदी, नाला व विहिरीवर हातपंप बसविले आहेत. मात्र वीज विभागाने मागील १५ दिवसांपासून भारनियमन सुरू केले असल्याने पिकांना पुरेशा प्रमाणात पाणी देणे अशक्य होत आहे. कृषीपंपांना केवळ रात्रीच्या सुमारास वीज उपलब्ध करून दिली जात आहे. दिवसा वीज पुरवठा खंडीत राहत असल्याने पाणी देणे शक्य होत नाही. धानपिकाला रात्री पाणी दिल्यानंतर दिवसा त्याच बांधीतील पाणी आटते व दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच बांधीला पाणी द्यावे लागते. एकंदरीत भारनियमनामुळे पूर्ण शेताला पाणी देणे अशक्य झाले झाले आहे. पावसाळ्यानंतर पाऊस कायमचा निघून गेला. त्यामुळे भूगर्भातील जमिनीची पातळी खोल गेली. परिणामी कुपनलिका व विहिरींनी तळ गाठला आहे. त्याचबरोबर नदी, नाले सुध्दा कोरडे पडले असल्याने पाणी देण्याचे कोणतेच साधन शेतकऱ्यांजवळ उपलब्ध नाही. हातात आलेले पीक करपतेवेळी शेतकऱ्यांना बघावे लागत आहे. उन्हाळी धान पिकासाठी अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढले आहेत. हे कर्ज कसे फेडावे, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. कुरखेडा तालुक्यातील कृषीपंपांना काही दिवस भारनियमनातून वगळण्यात यावे, अशी मागणी धान उत्पादक शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.