रिमिक्सच्या युगातही पारंपरिक नृत्याला रसिकांची पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2017 01:07 IST2017-03-03T01:07:35+5:302017-03-03T01:07:35+5:30

काळानुसार जीवनशैली, व्यासंग, आवडीनिवडी बदलत आहेत. समाजातील व्यक्तींची रूची, अभिरूचीही बदलत आहे.

In the era of remix, the traditional dance form liked the audience | रिमिक्सच्या युगातही पारंपरिक नृत्याला रसिकांची पसंती

रिमिक्सच्या युगातही पारंपरिक नृत्याला रसिकांची पसंती

सुरेखा पुणेकर यांनी लोकमतशी साधला मुक्त संवाद : अंतर्मनाचा ठाव घेणारी लावणी प्रेक्षकांच्या हृदयावर सदैैव अधिराज्य गाजवते
गोपाल लाजुरकर  गडचिरोली
काळानुसार जीवनशैली, व्यासंग, आवडीनिवडी बदलत आहेत. समाजातील व्यक्तींची रूची, अभिरूचीही बदलत आहे. याला संगीत, नृत्य अपवाद ठरले नाहीत. परंतु मराठी लावणी अद्यापही रसिकांच्या मनात ठसलेली आहे. रिमिक्स, डीजेचे युग असतानाही पारंपरिक लावणी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. प्रेक्षकांवर पारंपरिक नृत्याचा प्रभाव अद्यापही आहे, असे मत प्रसिध्द लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांनी व्यक्त केले. गुरूवारी लोकमतला दिलेल्या मुलाखतीत त्या दिलखुलास संवाद साधत होत्या.

आपले बालपण कोणत्या वातावरण गेले?
वडिलांच्या पिढीपासूनच घरी लावणी व नृत्याचे वातावरण होते. घरी तमाशाविषयी अनुकूल स्थिती असल्यामुळे मलासुद्धा बालपणापासूनच लावणी व नृत्याविषयी विशेष आवड निर्माण झाली. वयाच्या आठव्या वर्षापासूनच लावणीच्या स्टेजवर जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर अनेक कार्यक्रमांमधून लावणी, नृत्य करण्याची संधी प्राप्त झाल्याने दिवसेंदिवस नृत्यप्रतिभा बहरत गेली. या काळात शाळेत जाऊन औपचारिक शिक्षण कधीच घेतले नाही व त्याची गरजही भासली नाही. आई-वडिलांसोबत तमाशाच्या फडात सहभागी व्हायची सवयच लागली. नवरात्री उत्सवापासून मे महिन्यापर्यंत आई-वडिलांसमवेत तमाशा करायचा व कुटुंब चालवायचे, अशी स्थिती माझ्या लहानपणी होती. पावसाळ्यात तमाशाफड बंद राहत असल्याने धुणीभांडी करून उदरनिर्वाह करावे लागायचे.
लावणीने आपल्याला ओळख कधी निर्माण करून दिली?
१९८६ पासून विविध स्पर्धांमधून स्टेजवर येण्याची संधी मिळाली. अनेक गावांमध्ये तमाशाच्या माध्यमातून लावणी करीत असताना अनेक वर्षांचा कालावधी उलटला. परंतु १९९८ मध्ये अकलूज येथे झालेल्या लावणी स्पर्धेत हजारो स्पर्धकांमधून मला प्रथम क्रमांक मिळाला. या स्पर्धेत सव्वा लाखावर प्रेक्षकांची गर्दी होती. या स्पर्धेतूनच मला महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचण्याची संधी मिळाली. लावणीसम्राज्ञी म्हणून मला नवी ओळख मिळाली. या कार्यक्रमात मिळालेल्या बक्षिसांचा ठेवा मी अद्यापही जपलेला आहे. गुरू सुवासिनी देशपांडे यांचे मार्गदर्शन व प्रेक्षकांचे प्रेम यामुळे मला विशेष ओळख निर्माण झाली.
राज्यासह कोणत्या ठिकाणी प्रयोग सादर केलेत?
वेड्यांच्या हॉस्पिटलसह राष्ट्रपती भवनापर्यंत मी आजवर लावणीचे अनेक प्रयोग सादर केलेत. २००३ ते २००९ पर्यंत विशेषत: लंडन, अमेरिका, सिंगापूर परदेशात आदी ठिकाणी लावणीचे प्रयोग सादर केलेत. येथे प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसादही मिळाला.
प्रेक्षकांना तुमच्या कोणत्या लावण्या सर्वाधिक आवडतात?
लावण्यांमध्ये अनेक लावण्या लोकप्रिय असल्या तरी सुरेखा पुणेकर म्हटल्यानंतर ‘या रावजी, बसा भावजी’, ‘पिकल्या पानांचा देठ हिरवा’, ‘कारभारी दमान’, ‘झाल्या तिन्ही सांजा’ आदी चार लावण्या प्रेक्षकांना पूर्वीपासूनच अधिक भावतात. अंतर्मनाचा ठाव घेणारी लावणी रसिक प्रेक्षकांच्या हृदयावर सदैैव अधिराज्य गाजविते
आपणास भाषेची अडचण जाणवली नाही का?
जीवनात आपण औपचारिक शिक्षण कधीच घेतले नाही. परंतु लावणीसम्राज्ञी म्हणून मला ओळख मिळाल्यानंतर नातेवाईकांच्या मदतीने मराठी भाषा लिहिणे व वाचायला शिकले. जेव्हा परदेशांमध्ये जाण्याची संधी मिळाली. तेव्हा थोड्याफार प्रमाणात इंग्रजी भाषाही शिकली.

सर्वांच्या मदतीमुळे मला परदेशातही भाषेची अडचण जाणवली नाही.
लावणी कलाकारांसाठी शासनाकडून कोणत्या अपेक्षा आहेत?
लावणी नृत्य करणाऱ्या वृध्द कलावंतांना वृध्दापकाळात अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. विशेषत: त्यांना आर्थिक अडचण जाणवते. आपल्याकडे अनेकदा याविषयी तक्रारीही येतात. शासनाने वृध्द कलावंतांचे मानधन रखडून ठेवू नये. त्यांचे मानधन तत्काळ निकाली काढावे. असे झाल्यास कलावंतांना वृध्दापकाळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.
यापुढील आपला मानस काय?
लावणी नृत्याचे धडे देण्याकरिता मी पुणे येथे अ‍ॅकॅडमी उघडलेली आहे. येथे लावणी नृत्यासह वेशभूषा व लावणी संदर्भातील प्रत्येक गुण विकसीत करण्याबाबत धडे दिले जात आहेत. भविष्यकाळात याहून सरस करण्याचा आपला मानस आहे.
गडचिरोलीविषयी आपले मत काय?
गडचिरोली जिल्ह्याविषयी राज्यासह देशात वेगळीच भीती सांगितली जाते. परंतु येथे प्रत्यक्ष आल्यानंतर वेगळीच अनुभूती येत आहे. येथील लोकांच्या वागण्यात प्रेम, माणुसकी व बोलण्यात जिव्हाळा आहे. येथे प्रत्यक्ष आल्यानंतर आपल्या मनातील संपूर्ण भीती निघून गेली.

Web Title: In the era of remix, the traditional dance form liked the audience

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.