चामोर्शी पंचायत समिती सभापतिपदाची उत्कंठा शिगेला
By Admin | Updated: March 5, 2017 01:24 IST2017-03-05T01:24:15+5:302017-03-05T01:24:15+5:30
जिल्हा परिषदेची सत्ता हाती घेण्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये घमासान सुरू आहे.

चामोर्शी पंचायत समिती सभापतिपदाची उत्कंठा शिगेला
भाजपला स्पष्ट बहुमत : कुणाची लागणार वर्णी याकडे लागले आहे तालुक्यातील जनतेचे लक्ष
रत्नाकर बोमीडवार चामोर्शी
जिल्हा परिषदेची सत्ता हाती घेण्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये घमासान सुरू आहे. पंचायत समितीच्या सत्तास्पर्धेकडे जवळपास दुर्लक्ष झाले आहे. पंचायत समिती सत्ता सूत्रे हाती घेण्यासाठी सर्वत्र शांतता दिसत असली तरी अंतर्गत धूसफुस सुरू झाली आहे. चामोर्शी पंचायत समितीत भाजपला बहुमत असल्याने भाजपचाच सभापती व उपसभापती होईल. मात्र नेमक्या कोणत्या सदस्याच्या गळ्यात सभापती व उपसभापती पदाची माळ पडणार आहे, याकडे चामोर्शी तालुक्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
पंचायत समितीच्या एकूण १८ जागांपैकी भाजपने १३ जागा, काँग्रेसने २ जागा, जनसेवा विकास मंचाने २ तर शिवसेनेने १ जागा जिंकली आहे. चामोर्शी पंचायत समितीवर भाजपचे निर्विवाद बहुमत आहे. त्यामुळे भाजपचाच सभापती व उपसभापती बनणार हे निश्चित झाले आहे व त्याच्या चर्चाही रंगू लागल्या आहेत. मागील वेळी सुद्धा चामोर्शी पंचायत समितीवर भाजपाचीच सत्ता होती. प्रथम अडीच वर्ष वर्षा भांडेकर सभापती व मनमोहन बंडावार उपसभापती होते. अडीच वर्षानंतर सभापती म्हणून शशिबाई चिळंगे व उपसभापती म्हणून केशवराव भांडेकर यांनी सत्तासुत्रे हाती घेतली. परंतु एका वर्षातच भाजपात बंडखोरी होऊन आपल्याच पक्षाच्या केशव भांडेकर यांना उपसभापती पदावरून पायउतार केले व या जागेवर मंदा दुधबावरे यांना विराजमान केले. त्यावेळी भाजपच्या तब्बल पाच सदस्यांनी व्हीप नाकारल्याने त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मागील पाच वर्षात पंचायत समितीत चांगलीच रस्सीखेच दिसून आली होती. ही रस्सीखेच यापुढेही दिसून येणार आहे.
सभापती व उपसभापती पदासाठी उमेदवारांच्या नावाची चर्चा भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली आहे. यामध्ये माजी भाजपा तालुकाध्यक्ष व माजी पं. स. उपसभापती आनंद भांडेकर यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी कुनघाडा (रै.)-तळोधी जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपाची उमेदवारी मागीतली होती व त्यांच्या पत्नी माजी पं. स. सभापती वर्षा भांडेकर यांनी विसापूर (रै.)-कुरूळ जिल्हा परिषद क्षेत्रातून भाजपकडे उमेदवारी मागीतली होती. परंतु भाजपा पक्षश्रेष्ठींनी दोघांनाही जि. प. ची उमेदवारी न देता आनंद भांडेकर यांना कुनघाडा (रै.) पं. स. ची उमेदवारी दिली. यावेळी त्यांना पं. स. सभापती पदाची कमिटमेंट भाजप पक्षश्रेष्ठींनी भांडेकर यांच्यासोबत केली होती, अशी चर्चा भाजपच्या राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळे आनंद भांडेकर हे सभापती पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात आहेत. मात्र त्याचवेळी इतर क्षेत्रातूनही नावे समोर येण्यास सुरुवात झाली आहे.
चामोर्शी पंचायत समितीचे सभापती पद बहुजन समाजातील विशिष्ट समाजाच्या व्यक्तीलाच मिळत आहे. बहुजन समाजाचाच घटक असलेल्या कुणबी समाजाला सर्वांनीच डावलल्याची खंत व्यक्त केली जात आहे. त्यातही कुनघाडा (रै.), तळोधी (मो.), विक्रमपूर, कुरूळ, घोट याच गणातील व्यक्ती सभापती व उपसभापती अनेकवेळा विराजमान झाले आहेत. त्यामुळे इतरही गणांचा व समाजाचा विचार व्हावा, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये बळावत चालली आहे. त्यादृष्टीने वंदना गौरकार यांचेही नाव सभापती पदासाठी समोर येत आहे.