राखीव जंगल क्षेत्रावर अतिक्रमण भारी

By Admin | Updated: October 1, 2015 01:41 IST2015-10-01T01:41:46+5:302015-10-01T01:41:46+5:30

वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने देसाईगंज वनपरिक्षेत्रातील विहीरगाव, शिरपूर व शिवराजपूर बिटात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे.

Enraged over the reserve forest area | राखीव जंगल क्षेत्रावर अतिक्रमण भारी

राखीव जंगल क्षेत्रावर अतिक्रमण भारी

वन विभागाचे दुर्लक्ष : विहीरगाव, शिरपूर व शिवराजपूर बिटात अवैध वृक्षतोड
देसाईगंज : वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने देसाईगंज वनपरिक्षेत्रातील विहीरगाव, शिरपूर व शिवराजपूर बिटात गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू आहे. तसेच शेतजमिनीसाठी असलेल्या राखीव जंगल क्षेत्रावर अतिक्रमण करून ट्रॅक्टरच्या सहाय्याने सपाटीकरण करून शेती क्षेत्र वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. या परिसरात ५० हून अधिक सायकलस्वार उभ्या जंगलाची तोड करीत असल्याने या भागातील जंगल नष्ट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र याकडे वन विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
शिवराजपूर-फरी व विहीरगाव-मोहटोला-शिरपूर या मार्गावरील जंगल एकेकाळी घनदाट होते. मात्र शिवराजपूर ते फरी व विहीरगाव, मोहटोला परिसरात काही शेतकऱ्यांनी जंगल काबीज करून वनजमिनीचे सपाटीकरण करण्याचा सपाटा सुरू केला आहे. सपाटीकरण झाल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी या जमिनीत खरीप व रबी पिके घेण्यास सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस या भागातील राखीव जंगल क्षेत्रावर अतिक्रमण वाढतच चालले आहे. या क्षेत्रातील राखीव जमिनीवर पिढीजात कुणाचीही मालकी नसताना अनेक शेतकऱ्यांनी जंगलाची तोड करून शेतजमिनी काढण्याचा गोरखधंदा सुरू केला आहे. याशिवाय शहराच्या ठिकाणी जळाऊ लाकडे विकण्याचा व्यवसाय या भागातील दोन ते तीन गावातील नागरिकांनी सायकलद्वारे सुरू केला आहे.
विहीरगाव-शिरपूर बिटात अशा लोकांचा धूमाकुळ असल्याने जंगल नष्ट होऊन वन विभागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. मागील काही वर्षांपासून अनेक लाकूडतोड्याचे तांडेच्या तांडे या जंगल परिसरात दररोज जात असल्याने या भागातील जंगल संपुष्टात येण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे वन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यादेखत हा सारा प्रकार सुरू आहे. मात्र वन विभागाचे कर्मचारी कोणतीही कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे.
शिवराजपूर-विहीरगाव परिसरात अतिक्रमण व अवैध लाकूडतोड करून लाकडे विकण्याचा धंदा करणाऱ्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली आहे. राखीव जंगल क्षेत्रावर अतिक्रमण करण्याचा प्रकार जिल्हाभरात सुरू आहे. (तालुका प्रतिनिधी)
वन समित्या उरल्या नाममात्रच
जंगलाचे संरक्षण व संवर्धन व्हावे, अवैध वृक्षतोडीवर नियंत्रण राहावे, या हेतूने शासनाच्या निर्देशानुसार वन विभागाने प्रत्येक बिटात वनव्यवस्थापन समित्या गठित केल्या आहेत. या समित्यांमध्ये गावातील स्थानिक नागरिकांचा सहभाग आहे. मात्र विहीरगाव, शिरपूर, शिवराजपूर या बिटात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड व राखीव जंगल क्षेत्रावर अतिक्रमण सुरू असताना या समित्यांच्या पदाधिकाऱ्यांकडून कोणतीच कारवाई होत नाही. तसेच सदर प्रकार रोखण्यासाठी कुठलेही प्रयत्न होताना दिसून येत नाही. एकूणच या भागातील वनव्यवस्थापन समित्या नाममात्रच असल्याचे स्पष्ट होते.
वनजमिनी लगतच्या क्षेत्रात काही लाभार्थ्यांना वनजमिनीचे पट्टे देण्यात आले होते. त्यांना दिलेले क्षेत्र हे जीपीएस मशिनद्वारे तपासण्यात येईल, संबंधित पट्टेधारकांकडून या संदर्भाचे कागदपत्र मागवून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, या चौकशीत दोषी आढळल्यास संबंधीतांवर कायदेशिर कारवाई करणार.
- एन. डी. चांदेवार, वनपरिक्षेत्राधिकारी, देसाईगंज

Web Title: Enraged over the reserve forest area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.