खोट्या स्वाक्षरीच्या आधारे अभियंता रूजू
By Admin | Updated: February 25, 2015 01:42 IST2015-02-25T01:42:06+5:302015-02-25T01:42:06+5:30
स्थानिक पंचायत समितीमध्ये कार्यरत कृषी विस्तार अधिकारी ए. बी. ठाकरे यांनी सहायक गट विकास अधिकाऱ्यांच्या नावाची खोटी स्वाक्षरी करून स्थानांतरण...

खोट्या स्वाक्षरीच्या आधारे अभियंता रूजू
चौकशीची पं.स. सभापतीची मागणी
कोरची : स्थानिक पंचायत समितीमध्ये कार्यरत कृषी विस्तार अधिकारी ए. बी. ठाकरे यांनी सहायक गट विकास अधिकाऱ्यांच्या नावाची खोटी स्वाक्षरी करून स्थानांतरण झालेल्या शाखा अभियंता अरविंद चव्हाण यांना आस्थापणेवर रूजू करून घेतले. सदर बाब ही अतिशय गंभीर व दखलपात्र स्वरूपाची आहे. त्यामुळे या प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कोरची पंचायत समितीचे सभापती अवधराम बागमूळ यांनी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
अरविंद चव्हाण यांच्या रूजू प्रती वेदनावर विस्तार अधिकारी ए. बी. ठाकरे यांची सहायक संवर्ग विकास अधिकारी म्हणून स्वाक्षरी आहे. विस्तार अधिकारी ठाकरे यांना अभियंतासारख्या कर्मचाऱ्यांना खोटी स्वाक्षरी करून रूजू करून घेण्याचा अधिकार नाही, असेही पं.स. सभापती बागमूळ यांनी निवेदनात म्हटले आहे. माहितीच्या अधिकारात मिळालेल्या लेखी कागदपत्रांमध्ये रूजू प्रती वेदनावर सहायक गट विकास अधिकारी म्हणून ठाकरे यांची स्वाक्षरी आहे. सदर प्रकरणाची दखल घ्यावी, असेही बागमूळ यांनी म्हटले आहे.