धान मळणीचा शेवट गोड करणारी संजोरी झाली लुप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 06:00 AM2019-11-24T06:00:00+5:302019-11-24T06:00:33+5:30

विसाव्या शतकातील आठव्या दशकापर्यंत आजच्यासारखी अवघ्या काही तासात कापणी-मळणी करून धानरास घरी पोहचविणारी अत्याधुनिक यंत्रे नव्हती. परिणामी अनेक दिवस धानपिकाची मळणी चालायची. अशावेळी शेतातील धानाचे झालेले उत्पादन आणि झालेल्या श्रमातून मुक्तता यांचा आनंद म्हणून साजरा करण्याचा, शेतातल्या खऱ्यावरचा अन्नग्रहणाचा उत्सव म्हणजे संजोरी.

The end of the paddy sowing is sweetening | धान मळणीचा शेवट गोड करणारी संजोरी झाली लुप्त

धान मळणीचा शेवट गोड करणारी संजोरी झाली लुप्त

Next
ठळक मुद्देसंडे अँकर । यंत्राच्या वापराने शेतमजुरांचे अस्तित्व धोक्यात; मळणीच्या श्रमातून मुक्त झाल्याच्या आनंदात केले जात होते सामूहिक जेवण

अतुल बुराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : विसाव्या शतकातील आठव्या दशकापर्यंत आजच्यासारखी अवघ्या काही तासात कापणी-मळणी करून धानरास घरी पोहचविणारी अत्याधुनिक यंत्रे नव्हती. परिणामी अनेक दिवस धानपिकाची मळणी चालायची. अशावेळी शेतातील धानाचे झालेले उत्पादन आणि झालेल्या श्रमातून मुक्तता यांचा आनंद म्हणून साजरा करण्याचा, शेतातल्या खऱ्यावरचा अन्नग्रहणाचा उत्सव म्हणजे संजोरी. ही संजोरी गेल्या २० वर्षांपूर्वीपर्यंत शेतशिवारातील हरएक शेतात अगदी मजेत आयोजित होत असे. मात्र आता मानवनिर्मित तंत्रयुक्त वेगवान यंत्रांचा कृषी क्षेत्रात सुद्धा शिरकाव झाल्याने खऱ्यावरची धानपिक मळणी आणि मळणीचा शेवट अतीव गोड करणाºया संजोरीची अस्सल गावरान मजा काळाच्या ओघात लुप्त झाली आहे.
धानाचे पीक परिपक्व झाल्यानंतर बळीराजाला धानपिक कापणी-मळणीची उत्सुकता लागायचे. धानकापणी सुरू झाल्यावर काहीच दिवसांत बांधणी करून धान पुंजणे रचले जात. इथून धानपीक शेतीचा अगदी शेवटचा पर्व प्रारंभ व्हायचा. खऱ्याच्या मध्यभागी एक लाकडी मेळ गाडल्या जात असे. त्या मेळाला दोर बांधून तो पहिल्या बैलाच्या गळ्यातील दोर दुसऱ्या बैलाच्या गळ्यात असे सलग ९ ते १० बैल बांधले जात, त्यालाच बैलाची पात म्हणत. फार पूर्वीपासूनच बैल हा शेतातल्या श्रमाचा राजा. बैलांची पात तयार करून खºयावर टाकलेल्या धानाच्या पिकावर तासनतास चालवले जात. बैलांच्या खूरांनी धानाची मळणी होत असे. बैलांच्या पातीने अनेक वर्षे धानपिक मळणी चालली. काही दिवसानंतर बैलांची पात मागे पडून बैलाच्या जोडीला मागे लाकडी बेलन बांधून धानपीक मळणी सुरू झाली. ही पद्धत पण काही वर्षेच कायम होती. तासनतास मळणी झाल्यावर खºयावरची तणस लाकडी आकोडीने बाहेर काढून धानाचे ठिग तयार करत. या धानाच्या ठिगांना झाडीबोलीत मंदन म्हटले जात असे. आणि पहाटे पहाटे उठून सुपात घेऊन हवेच्या दिशेने हे मंदनातील धान उडवले जात. त्यामुळे धानातील कचरा उडून धानरास तयार करत. धानरास म्हणजे साफसूफ केलेले धान. धानरास ही अख्ख्या हंगामाची कमाई म्हणून त्याची देखभाल आणि रक्षण अगदी डोळ्यात तेल घालून करण्यात येत असे.
बैलबंडी वापरून धानरास घरापर्यंत आणल्या जाई. यादरम्यान शेतीमालक पुरुष आणि त्याच्या घरची पुरुष मंडळी आणि पुरुष मजूर या सर्वांचा मुक्काम शेतात रहायचा. धानपिकाच्या मळणीचे काम पूर्ण झाल्यानंतर केला जाणारा सामुहिक मांसाहारी जेवण म्हणजे, संजोरी होय. या जेवणाला मित्र वा आप्त सुद्धा यायचे. ही मजा आज वयाची साठी पूर्ण केलेल्या हरएक शेतकऱ्यांनी अनुभवली आहे.

मिनी हार्वेस्टरने कापणी व बांधणी धोक्यात
कापणी, बांधणीचे काम आजपर्यंत मजुरांच्या सहाय्याने केले जात होते. कापणीसाठी काही प्रमाणात ट्रॅक्टरचा वापर केला जात होता. मात्र बांधणीचे कामे मजुरांच्या मार्फतच केली जात होती. आता कापण्याबरोबरच तेव्हाच्या तेव्हा कापलेले धान मळणी करणारे यंत्र विकसीत झाले आहे. याला हार्वेस्टर असे संबोधले जात होते. हार्वेस्टरची किंमत जवळपास ५० लाख रुपये असल्याने ते खरेदी केले जात नव्हते. आता मिनी हार्वेस्टर उपलबध आहे. याची किंमत जवळपास १५ लाख रुपये आहे. काही शेतकºयांनी व बचत गटांनी सदर हार्वेस्टर खरेदी केले आहे. त्यामुळे आता मजुरांमार्फत कापणी व बांधणीही संपणार आहे.

ट्रॅक्टर ठरले बहुउपयोगी यंत्र
१९५४ च्या जवळपास विसोरा आणि आजूबाजूच्या परिसरात ट्रॅक्टर आला. ट्रॅक्टर हा शेतकºयासाठी ठरलेला बहुउपयोगी यंत्र आहे. या ट्रॅक्टरने बैलजोडी, बैलबंडी, नागर, तिफन, वखर, फण आदी पारंपारिक यंत्रांची जागा घेतली आहे. ही सर्व यंत्रे ट्रॅक्टरला लावता येतात. या यंत्रांचा वापर करून शेतीची कामे केली जात आहेत. त्यामुळे ट्रॅक्टर हा शेतकऱ्यांसाठी बहुउपयोगी यंत्र ठरला आहे.

Web Title: The end of the paddy sowing is sweetening

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.