पट्टेधारकांच्या जमिनीवर अतिक्रमण
By Admin | Updated: August 25, 2015 01:35 IST2015-08-25T01:35:04+5:302015-08-25T01:35:04+5:30
परिसरातील आदिवासी गरीब भूमीहिनांना सन १९७७-७८ मध्ये महाराष्ट्र शासनाने तालुक्यातील चामोर्शी चक येथील

पट्टेधारकांच्या जमिनीवर अतिक्रमण
आरमोरी : परिसरातील आदिवासी गरीब भूमीहिनांना सन १९७७-७८ मध्ये महाराष्ट्र शासनाने तालुक्यातील चामोर्शी चक येथील जमिनी वाटपात दिल्या आहे. या आदिवासी शेतकऱ्यांच्या जमिनीवर काही धनाढ्य लोकांनी अतिक्रमण केले. आदिवासींच्या जमिनी हडप करणाऱ्यांवर अनुसूचित जाती, जमाती कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अतिक्रमण काढून पट्टेधारकांना कब्जा देण्यात यावा आदींसह विविध मागण्यांसाठी अन्यायग्रस्त आदिवासी शेतकऱ्यांनी सोमवारपासून येथील तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले.
आरमोरी तालुक्यातील ७८ आदिवासी भूमीहिन शेतकऱ्यांना सन १९७७-७८ मध्ये शासनाने चामोर्शी चक येथे २२६.४२ हेक्टर आर शेतजमिनीचे पट्टे वितरित केले. काही श्रीमंत लोकांनी आदिवासींच्या शेत जमिनीवर कब्जा केला. देसाईगंजचे उपविभागीय अधिकारी यांच्या कोर्टाने अतिक्रमण धारकांचे बळजबरीने केलेले अतिक्रमण अवैध ठरविले. तसेच गडचिरोलीच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने पट्टेधारक शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये अतिक्रमणधारकांनी हस्तक्षेप करू नये, असे आदेशही दिले. देसाईगंजच्या एसडीओंनी आरमोरीच्या तहसीलदारांना सदर अतिक्रमणाबाबत त्वरित कार्यवाही करण्याचे आदेश देऊन सुद्धा आरमोरीच्या तहसीलदारांनी कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. पट्टेधारक शेतकऱ्यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले. आ. क्रिष्णा गजबे यांनी तहसीलदारासह उपोषण मंडपास भेट दिली. याप्रकरणात आपण लक्ष घालून प्रत्यक्ष मोका चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यात येईल, असे आश्वासन आ. गजबे यांनी दिली. त्यानंतर लिंबूशरबत पाजून उपोषणाची सांगता करण्यात आली. (तालुका प्रतिनिधी)