एटापल्लीत अतिक्रमण हटविले

By Admin | Updated: January 21, 2016 00:15 IST2016-01-21T00:15:48+5:302016-01-21T00:15:48+5:30

१२ वर्षांनंतर कारवाई : दीड किमी अंतरावरील व्यावसायिकांना फटका

Encroachment deleted at Atapalli | एटापल्लीत अतिक्रमण हटविले

एटापल्लीत अतिक्रमण हटविले

१२ वर्षांनंतर कारवाई : दीड किमी अंतरावरील व्यावसायिकांना फटका
एटापल्ली : सार्वजनिक बांधकाम विभागाने तब्बल १२ वर्षानंतर आलापल्ली ते जारावंडी या प्रमुख मार्गावरील एटापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम कार्यालय ते वन विभागाच्या तपासणी नाक्यापर्यंत दीड किमी अंतरावरचे अतिक्रमण बुधवारी सकाळी १० वाजतापासून हटविण्यास सुरुवात केली.
येथील मुख्य रस्ता राज्य मार्ग क्र. ३६३ वरील वाढत्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने २२ डिसेंबर २०१५ रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अतिक्रमणधारकांना नोटीस बजाविण्यात आले होते. परंतु अतिक्रमणधारकांनी दुर्लक्ष केले.
सदर अतिक्रमण एटापल्ली येथील सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयापासून वन तपासणी नाकापर्यंत काढण्यात आले. यात पंचायत समिती, व्यापारी संकुलाचे टिनाचे शेड अतिक्रमणात आल्याने ते पाडण्यात आले. तसेच मुख्य मार्गावरील अनेक व्यापाऱ्यांचे कच्च्या स्वरूपाचे टिनाचे शेड, नालीवरील फरशा, काही ठिकाणी उंचवटे असे अतिक्रमण दिवसभर हटविण्यात आले. नोटीसमध्ये सात दिवसांच्या आत अतिक्रमण हटवावे, ते न हटविल्यास सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हटविण्यात येईल, असे बजाविण्यात आले होते.
सदर कारवाई उपविभागीय अभियंता एम. डी. शेवाळकर, नायब तहसीलदार आर. बी. मेश्राम, पोलीस निरीक्षक सुहास आव्हाड, कनिष्ठ अभियंता पंकज उईके, सहायक विनोद चिंचोडकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. सकाळी १० वाजता ही मोहीम सुरू होऊन सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Encroachment deleted at Atapalli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.