शहरातील तलावात अतिक्रमण सुरूच
By Admin | Updated: November 30, 2014 23:05 IST2014-11-30T23:05:06+5:302014-11-30T23:05:06+5:30
मूल मार्गावर बाजाराजवळ असलेल्या तलावाच्या परिसरात अतिक्रमण करणे सुरूच आहे. मात्र याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे

शहरातील तलावात अतिक्रमण सुरूच
गडचिरोली : मूल मार्गावर बाजाराजवळ असलेल्या तलावाच्या परिसरात अतिक्रमण करणे सुरूच आहे. मात्र याकडे सिंचन विभागाचे दुर्लक्ष झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फतीने या तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र सदर कामसुध्दा रखडले आहे.
शहराच्या मधोमध असलेल्या तलावाचे सौंदर्यीकरण केल्यास शासनाला महसूल मिळण्याबरोबरच शहरातील नागरिकांनाही फेरफटका मारण्याचे ठिकाण उपलब्ध होईल. यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी अतुल पाटणे यांनी तलावाचे सौंदर्यीकरण करण्याचे काम हाती घेतले. त्यासाठी आवश्यक ते नियोजन करून काही प्रमाणात निधीसुध्दा उपलब्ध करून देण्यात आला. या निधीतून तलावाच्या पाळीचे काही प्रमाणात काम करण्यात आले. त्यामुळे सौंदर्यीकरण होईल, अशी अपेक्षा येथील नागरिक बाळगत असतानाच अचानक या तलावाच्या सौंदर्यीकरणाचे काम बंद पडले. तेव्हापासून ते काम कायमचे बंद आहे. मागील पाच वर्षांपासून काही नागरिकांनी या तलावामध्ये अतिक्रमण करून पक्की घरे बांधले आहेत. सध्या आता पाण्याची पातळी कमी होऊ लागली असल्याने काही नागरिकांनी अतिक्रमण करणे सुरू केले आहे. त्याचबरोबर काही नागरिकांनी तलावाच्या ओव्हरफ्लो भागातही अतिक्रमण करीत आहे. काही दिवस वाद चालल्यानंतर नगर परिषद त्यांना आवश्यक असलेल्या सोयीसुविधा पुरविते. त्यामुळे अतिक्रमण थांबणार कसे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
तलाव शहराच्या मध्यभागी असले तरी या तलावावर मालकी हक्क मात्र सिंचन विभागाचे आहे. या दोन विभागांच्या भांडणात या तलावाचे सौंदर्यीकरण रखडले आहे. त्याचबरोबर होत असलेल्या अतिक्रमणावरही अंकूश घालणे कठीण झाले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: हस्तक्षेप करून या ठिकाणी केलेले अतिक्रमण काढावे, अशी मागणी होत आहे. (नगर प्रतिनिधी)