रेशीम लागवडीला रोजगार हमी योजनेचे बळ
By Admin | Updated: October 29, 2014 22:50 IST2014-10-29T22:50:46+5:302014-10-29T22:50:46+5:30
रेशीम लागवडीचे काम आता रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे रोहयो मजुरांना वर्षभर काम मिळण्याबरोबरच रेशीम लागवड शेतकऱ्यालाही मजूर मिळणार आहेत.

रेशीम लागवडीला रोजगार हमी योजनेचे बळ
गडचिरोली : रेशीम लागवडीचे काम आता रोजगार हमी योजनेच्या माध्यमातूनही करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यामुळे रोहयो मजुरांना वर्षभर काम मिळण्याबरोबरच रेशीम लागवड शेतकऱ्यालाही मजूर मिळणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात कुरखेडा, गडचिरोली, आरमोरी तालुक्यात रेशीमचे उत्पादन घेतले जाते. यातून शेकडो नागरिकांना रोजगार मिळत आहे. आरमोरी येथे रेशीमचे स्वतंत्र कार्यालयात स्थापन करण्यात आले आहे. झाडांवर रेशीम किडे सोडून त्यांची देखभाल केली जाते. गडचिरोली जिल्ह्यात ५०० हून अधिक हेक्टरवर रेशीमची शेती केल्या जाते. रेशीम उत्पादन हा शेतीशी संबंधित व्यवसाय असला तरी रेशीम उत्पादनाची कामे रोहयोच्या माध्यमातून करण्यास शासनाची परवानगी नव्हती. त्यामुळे रोहयो मजूर रेशीम उत्पादनाचे काम करतांना दिसून येत नव्हते. मात्र राज्य शासनाने नुकत्याच घेतलेल्या निर्णयानुसार रोहयो मजुरांना रेशीम उत्पादनाचेही काम दिले जाणार आहे. रेशीम उत्पादन हा वर्षभर चालणारा व्यवसाय आहे. त्यामुळे रेशीमच्या माध्यमातून रोजगार हमी योजनेच्या मजुरांना जास्तीत जास्त रोजगार मिळण्यास मदत होणार आहे.
रेशीम किडे सोडणे, त्यांचे संगोपण करणे, झाडांची छाटणी करणे, रेशीम किडे गोळा करणे आदी कामांसाठी शेकडो मजुरांची गरज भासत होती. वेळेवर मजूर न मिळाल्याने वेळप्रसंगी तोटाही सहन करावा लागत होता. यातून आता रेशीम उत्पादकांची सुटका होण्यास मदत होणार आहे. या योजनेंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यासाठी १ लाख ९६ हजाराचे अंदाजपत्रक तयार करावे लागणार असून त्यामध्ये नऊ हजार रूपये लाभार्थ्याचा भत्ता राहणार आहे. अजूनपर्यंत जिल्ह्यात लाभार्थ्यांची निवड करण्यात आली नसल्याची माहिती आहे. (नगर प्रतिनिधी)