वनोपजांमुळे महिलांना रोजगार
By Admin | Updated: April 9, 2015 01:55 IST2015-04-09T01:55:11+5:302015-04-09T01:55:11+5:30
जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वाधिक असल्याने येथील जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती आहेत.

वनोपजांमुळे महिलांना रोजगार
गडचिरोली : जिल्ह्यात वनक्षेत्र सर्वाधिक असल्याने येथील जंगलात विविध प्रकारच्या वनस्पती आहेत. या वनस्पतींपासून अनेक प्रकारची फळे, औषधी तसेच इतर कामांसाठी लाकूड उपलब्ध होतो. सध्या दुर्गम भागात भरपूर प्रमाणात असलेल्या टेंभू वनस्पतीची फळे, चारोळ्या विक्रीसाठी बाजारात आणल्या जात आहे. त्यामुळे दुर्गम भागातील महिलांना रोजगार उपलब्ध होत आहे.
जिल्ह्यात सध्या मोहफूल वेचणीचा हंगाम सुरू आहे. शिवाय अनेक गावातील महिला व पुरूष पहाटेपासून मोहफूल वेचण्याकरिता शेतात तसेच जंगलात जात आहेत. पहाटेपासून मोहफूल पडण्यास सुरूवात होते. त्यानंतर जवळपास दुपारी तीन वाजेपर्यंत मोहफूल पडत असल्याने अनेक महिला व पुरूष दुपारपर्यंत शेत शिवारातच असतात. याशिवाय सकाळी दुर्गम भागातील महिला टेंभू फळ, चारोळी वेचण्याकरिता जातात. फळे गोळा करून ते जिल्हा व तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी विक्रीसाठी ठेवत आहेत. चार शेर टेंभू फळांना ४० ते ५० रूपये किंमत आकारली जात आहे. ग्राहकांचीही फळांना अधिक पसंती असल्याने मागणीही बऱ्या प्रमाणात आहे. जिल्ह्यातील सिरोंचा, धानोरा, एटापल्ली तालुक्यातून महिला जिल्हा व तालुका मुख्यालयात फळ विक्रीसाठी येत आहेत. या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध होत असल्याने दुर्गम भागात एक उपजीविकेचे साधन निर्माण झाले आहे. (शहर प्रतिनिधी)