८० हजार कुटुंबांना रोजगार
By Admin | Updated: March 23, 2015 01:22 IST2015-03-23T01:22:50+5:302015-03-23T01:22:50+5:30
रोजगार हमी योजनेचे काम मिळावे, यासाठी जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ४३५ कुटुंबांनी २०१४-१५ या वर्षात अर्ज केला होता.

८० हजार कुटुंबांना रोजगार
गडचिरोली : रोजगार हमी योजनेचे काम मिळावे, यासाठी जिल्ह्यातील १ लाख ९७ हजार ४३५ कुटुंबांनी २०१४-१५ या वर्षात अर्ज केला होता. त्यापैकी ८० हजार ७०४ कुटुंबांना प्रत्यक्ष रोजगार प्राप्त झाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात उद्योग नसल्याने धानाचा हंगाम संपताच रोजगाराची शोधाशोध सुरू होते. काही मजूर जिल्ह्यात रोजगार मिळत नसल्याने छत्तीसगड, चंद्रपूर व नागपूर येथे जातात. शेत मजुरांबरोबरच अल्प भूधारक शेतकरीही कामाच्या शोधात बाहेर निघतात. रोजगार हमी योजनेने मात्र ग्रामीण भागातील नागरिकांना हक्काचे रोजगाराचे साधन उपलब्ध करून दिले आहे. या कामाची १६५ रूपयांपेक्षा जास्त मजुरी दिल्या जाते. परिणामी मजुरांचा ओढा या कामाकडे वाढतच चालला आहे.
२०१४- १५ या वर्षात १ लाख ९७ हजार नागरिकांनी कामाची मागणी केली. त्यापैकी ८० हजार ७०४ कुटुंबांना रोजगार पुरविण्यात आला. यामध्ये १ लाख ६१ हजार १२० नागरिकांचा समावेश आहे. वर्षभरातून सुमारे ३४ लाख ५४ हजार ३०१ दिवस रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
गरजू नागरिकांना रोजगार मिळावा यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने नियोजनबद्ध काम आखले जात आहे. धानाचा हंगाम निघाल्यानंतर मजुरांना रोजगार मिळत नाही. अशा दिवसांमध्ये रोहयोचे काम सुरू केले जाते. रोहयोच्या माध्यमातून पांदन रस्ते, मजगी, बोडी, तलाव बांधण्याचे काम हाती घेतले जाते. यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना रस्त्याची सुविधा उपलब्ध होण्याबरोबरच पडीत जमीन पिकाखाली येण्यास मदत होत आहे. परिणामी ग्रामीण भागातील नागरिकांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. (नगर प्रतिनिधी)