६ हजार ६५० युवकांना मिळाला मेळाव्यातून रोजगार
By Admin | Updated: February 1, 2016 01:33 IST2016-02-01T01:33:47+5:302016-02-01T01:33:47+5:30
तालुक्यातील नागेपल्ली येथे शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्हाभरातील सुमारे ६ हजार ६५० युवकांना रोजगार प्राप्त झाला आहे.

६ हजार ६५० युवकांना मिळाला मेळाव्यातून रोजगार
अहेरीत मेळावा : शेवटच्या उमेदवाराच्या मुलाखतीपर्यंत पालकमंत्र्यांची उपस्थिती
अहेरी : तालुक्यातील नागेपल्ली येथे शनिवारी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्हाभरातील सुमारे ६ हजार ६५० युवकांना रोजगार प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच रोजगार उपलब्ध असल्याचे सांगीतले जात आहे.
जिल्ह्यात एकही मोठा उद्योग नसल्याने रोजगाराची समस्या बिकट झाली आहे. येथील शिकलेल्या युवकांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या मार्गदर्शनात अहेरी येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला जिल्हाभरातील हजारो युवक सहभागी झाले होते. बचत गटाच्या महिलाही उपस्थित होत्या. मेळाव्याला सुमारे २०० कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. १० हजार ७९० युवकांना रोजगार मिळेल अशा प्रकारचे बॅनर मेळाव्यादरम्यान लावण्यात आले होते. कंपन्यांच्या प्रतिनिधींनी युवकांच्या मुलाखती घेवून सुमारे ६ हजार ७९० युवकांना नियुक्ती पत्र देण्यात आले. विशेष म्हणजे शेवटच्या युवकाची मुलाखत होईपर्यंत पालकमंत्री मेळाव्यामध्येच बसलेले होते. काही उमेदवारांना रात्री उशिरापर्यंत पालकमंत्र्यांनी स्वत: प्रमाणपत्रांचे वितरण केले. विशेष म्हणजे सर्वच उमेदवारांना चांगल्या वेतनाच्या नौकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. (तालुका प्रतिनिधी)
युवती व महिलांची गर्दी
रोजगार मेळाव्याला विशेष करून महिला व युवतींनी सर्वाधिक हजेरी लावली होती. त्यामुळे नोकऱ्यांमध्येही युवतीचेंच प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. महिला बचत गटाच्या महिलांनाही मार्गदर्शन करण्यात आल्याने गटाच्या महिलाही उपस्थित होत्या.