आरसेटीतर्फे १६८१ युवकांना रोजगार

By Admin | Updated: April 6, 2017 01:29 IST2017-04-06T01:29:53+5:302017-04-06T01:29:53+5:30

केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या स्टार स्वयंरोजगार संस्थेच्या वतीने २०१७ पर्यंत

The employment of 1681 youths by the Arsenal | आरसेटीतर्फे १६८१ युवकांना रोजगार

आरसेटीतर्फे १६८१ युवकांना रोजगार

पत्रकार परिषदेत माहिती : गतवर्षी ८६६ युवकांना प्रशिक्षण
गडचिरोली : केंद्र सरकारच्या ग्रामीण विकास मंत्रालयाच्या वतीने चालविण्यात येणाऱ्या स्टार स्वयंरोजगार संस्थेच्या वतीने २०१७ पर्यंत कालावधीत सुमारे २ हजार ३४८ प्रशिक्षणार्थ्यांना प्रशिक्षण दिले असून त्यापैकी १ हजार ६८१ प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे, अशी माहिती आरसेटीचे कार्यक्रम समन्वयक पी. डी. काटकर यांनी पत्रकार परिषदेदरम्यान दिली आहे.
ग्रामीण भागातील रोजगाराची समस्या सोडविण्यासाठी आरसेटीची स्थापना करण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्यात ६ जानेवारी २०१० साली या संस्थेची स्थापना झाली. मात्र प्रत्यक्ष कार्याला २०१५ पासून सुरुवात झाली. प्रशिक्षणार्थ्यांनी मागणी केल्यानंतर त्यांना त्या-त्या प्रकारचे अल्प कालावधीचे प्रशिक्षण आरसेटीच्या माध्यमातून दिले जाते. किमान सहा दिवस ते एक महिना हा प्रशिक्षणाचा कालावधी राहतो. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सदर व्यक्तीने स्वयंरोजगार स्थापन करावा, यासाठी आरसेटी संस्था स्वत: पुढाकार घेऊन विविध बँकांच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून देते. प्रशिक्षण प्राप्त केलेल्या एकूण २ हजार ३४८ प्रशिक्षणार्थ्यांपैकी १ हजार ६८१ प्रशिक्षणार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला आहे. ४३९ प्रशिक्षणार्थ्यांना विविध बँकांच्या माध्यमातून ६ कोटी ६२ लाख रूपयांचे कर्ज उपलब्ध करून दिले. २०१६-१७ मध्ये २९ बॅचेसमधून ८६६ युवकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. २०१७-१८ मध्ये एकूण ७५० युवकांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. आरसेटीच्या माध्यमातून बकरी पालन, ब्युटी पार्लर, कुकुटपालन, विद्युत उपकरणे दुरूस्ती, वराह पालन, खेळणी निर्मिती, मच्छीपालन, दिव्यांग उद्योग, भाजीपाला लागवड, औषधी वनस्पती लागवड, रेशीम उद्योग, मशरूम लागवड आदींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. या प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा, असे आवाहन पी. डी. काटकर यांनी केले. यावेळी संचालक टेकाम, पी. एम. दहिकर, जिल्हा उद्योग केंद्राचे उद्योग निरीक्षक व्ही. एस. भोंबे, सहायक कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: The employment of 1681 youths by the Arsenal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.