वेतनाविना कर्मचारी संकटात
By Admin | Updated: June 10, 2016 01:28 IST2016-06-10T01:28:44+5:302016-06-10T01:28:44+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या खासगी अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक ...

वेतनाविना कर्मचारी संकटात
तीन महिन्यांचे वेतन नाही : प्रकल्प कार्यालयाकडून दिरंगाई
आरमोरी : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत चालविल्या जाणाऱ्या खासगी अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे मार्च ते मे २०१६ या तीन महिन्यांचे वेतन प्रलंबित आहे. प्रकल्प कार्यालयाच्या सततच्या दिरंगाईमुळे आश्रमशाळेतील शिक्षक व कर्मचारी आर्थिक संकटात सापडले आहेत.
गडचिरोली प्रकल्प कार्यालयामार्फत खासगी अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन तीन लेखाशिर्षकामध्ये विभागून दिले जाते. शासनाकडून अनुदान प्राप्त झाले नाही, असे कारण पुढे करून अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन अदा करण्यात आले नाही. अनुदानित आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत प्रकल्प कार्यालय संवेदनशील नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे वेतन तीन ते चार महिन्यांच्या अंतराने एका महिन्याचे वेतन देण्याचा जणू प्रकल्प कार्यालयाने नियमच केलेला आहे. प्रत्येक वेळेस वेतनाबाबत कर्मचाऱ्यांना वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेली जात आहे. तीन-तीन महिने आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन होत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांना मुलांचा शाळा प्रवेश, सामाजिक कार्यक्रम, लग्न समारंभ व बँकेच्या कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मोठी अडचण जाणवत आहे. वेळेवर वेतन होत नसल्यामुळे आश्रमशाळांच्या अनेक कर्मचाऱ्यांवर उसणवार पैसे घेऊन कुटुंब चालवावा लागत आहे.
दिरंगाईमुळे बँकेच्या कर्जाच्या व्याजाची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. गडचिरोली प्रकल्प कार्यालयाच्या दफ्तर दिरंगाईमुळे कर्मचाऱ्यांना मानसिक व आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. नियमित वेतन देण्यात यावे, अशी मागणी होत आहे. (वार्ताहर)