प्रतिभेच्या जोरावर मिळविला रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2019 21:55 IST2019-06-29T21:54:59+5:302019-06-29T21:55:16+5:30
बालपणापासूनच भजन, किर्तन, गायन, वादन असे संगीतमय वातावरणामुळे संगीताची ओढ व आकर्षण निर्माण झाले. काही दिवसानंतर प्रतिभाही निर्माण झाली. या प्रतिभेच्या जोरावर देसाईगंज तालुक्याच्या पाच युवकांनी संगीताच्या माध्यमातून रोजगार मिळविला आहे.

प्रतिभेच्या जोरावर मिळविला रोजगार
अतुल बुराडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : बालपणापासूनच भजन, किर्तन, गायन, वादन असे संगीतमय वातावरणामुळे संगीताची ओढ व आकर्षण निर्माण झाले. काही दिवसानंतर प्रतिभाही निर्माण झाली. या प्रतिभेच्या जोरावर देसाईगंज तालुक्याच्या पाच युवकांनी संगीताच्या माध्यमातून रोजगार मिळविला आहे.
संगीत मैफील संच तयार करून विविध सार्वजनिक व खासगी कार्यक्रमात हे पाच तरूण लोकांपुढे आपली कला सादर करीत आहेत. या संचात सावंगीचे गायक व तबलावादक यशवंत बगमारे, हार्मोनियम वादक उत्तम ढोरे, गायक भूषण ठाकरे, महेश दिवटे व एकलपूर येथील गायक अमोल भागडकर तसेच सोमलपूर येथील यशवंत बावणे या युवकांचा समावेश आहे.
ग्रामीण व शहरी भागात होणारे नवरात्रोत्सव, शारदा-दुर्गा उत्सव, गणेशोत्सव आदी सार्वजनिक कार्यक्रमासह खासगी कार्यक्रमात हे पाच तरूण आपली कला लोकांसमोर सादर करून त्यांचे मनोरंजन करीत आहे. मराठी, हिंदी अशा फिल्मी तसेच गझल, कवाली, भावगीत, भक्तगीते, भिमगीत तसेच धार्मिक गीतांचा नजरांना या संचातर्फे सादर केला जातो. मागील तीन वर्षांपासून या पाच युवकांनी आपल्या कलेची झलक दाखविली आहे.
शालेय जीवनापासून संगीत कलेची ओढ
सावंगी, एकलपूर येथील पाच तरूणांमध्ये शालेय वयापासून संगीत कलेची ओढ होती. शिक्षण घेत असतानाच या तरूणांनी सदर कला जोपासली व तिला विकसीत केली. विशेष म्हणजे, या पाच तरूणांचा कोणीही गुरू नाही. स्वत:च्या प्रतिभेच्या जोरावर अहोरात्र परिश्रम व सराव करून या तरूणांनी कलेमध्ये निपुणता मिळविली. शासकीय नोकरीसाठी वणवण भटकण्यापेक्षा तसेच बेरोजगाराचे चटके सहन करण्यापेक्षा त्यांनी कलेलाच रोजगाराचे साधन बनविले.