अमिर्झातील वीज केंद्र सुरू
By Admin | Updated: August 6, 2016 01:02 IST2016-08-06T01:02:23+5:302016-08-06T01:02:23+5:30
तालुक्यातील अमिर्झा येथे नवीन वीज उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली असून ५ आॅगस्ट रोजी या

अमिर्झातील वीज केंद्र सुरू
गडचिरोली : तालुक्यातील अमिर्झा येथे नवीन वीज उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली असून ५ आॅगस्ट रोजी या वीज केंद्रातून अमिर्झा, मौशिखांब, बामणी परिसरातील गावांना विजेचा पुरवठा करण्यात आला.
अमिर्झा परिसरातील गावांना गडचिरोली येथील पोटेगाव मार्गावर असलेल्या उपकेंद्रातून विजेचा पुरवठा केला जात होता. परंतु वीज वाहिन्यांची लांबी फार मोठी असल्यामुळे त्याचबरोबर जंगल परिसरातून विद्युत लाईन गेली असल्यामुळे ग्रामीण भागाला वेळोवेळी कमी दाबाचा वीज पुरवठा होत होता. त्याचबरोबर नेहमी वीज पुरवठा सुद्धा खंडित होत होता. यावर उपाय म्हणून वीज कंपनीने मध्यवर्ती गाव असलेल्या अमिर्झा येथे नवीन उपकेंद्राची निर्मिती केली. या उपकेंद्रातून ११ के व्ही अमिर्झा, मौशिखांब व बामणी वीज वाहिन्यांमधून वीज पुरवठा सोडण्यात आला. अमिर्झा येथे स्वतंत्र वीज उपकेंद्र झाल्यामुळे या परिसरातील नागरिकांसाठी सोयीचे झाले आहे. अखंडित व योग्य दाबाचा वीज पुरवठा होईल, अशी अपेक्षा महावितरणचे गडचिरोली तालुक्याचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता आर. पी. चव्हाण, ग्रामीण भागातील सहायक अभियंता पुरूषोत्तम वंजारी यांनी व्यक्त केली आहे. नवीन वीज वाहिन्यांच्या खाली कुठलेही बांधकाम करू नये, या वाहिन्यांवर चढण्याचा प्रयत्न करू नये, तसेच खांबाला व स्टे वायरला जनावरे बांधू नये, असे आवाहनसुद्धा वीज कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे. (नगर प्रतिनिधी)