पेठा ग्रामपंचायतीत ४७ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 05:01 IST2020-06-27T05:00:00+5:302020-06-27T05:01:05+5:30

या अपहारात पेठा येथील अपहार ४१ लाखांचा तर तोडका येथील अपहार ६.४ लाखांचा आहे. जिल्हा परिषदेचे सहायक गटविकास अधिकारी (पंचायत) यांनी यासंदर्भातील अहवाल दिला होता. त्यानंतर संबंधितांना यापूर्वी नोटीसही बजावण्यात आल्या. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. अपहाराची रक्कम संबंधितांनी ३० जूनपर्यंत जमा न केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे.

Embezzlement of Rs. 47 lakhs in Petha Gram Panchayat | पेठा ग्रामपंचायतीत ४७ लाखांचा अपहार

पेठा ग्रामपंचायतीत ४७ लाखांचा अपहार

ठळक मुद्देचौकशी अहवालात ठपका : ग्रामकोष समित्यांसह सचिवांना नोटीस, ३० पर्यंत रक्कम भरण्याचे निर्देश

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी तालुक्यातील पेठा ग्रामपंचायतअंतर्गत पेठा आणि तोडका (स.) या दोन गावांमध्ये १०१४ पासून १४ वा वित्त आयोग, ५ टक्के अबंध निधी, तेंदूपत्ता बोनस यासह साहित्य खरेदीमधील मिळून एकूण ४७ लाखांचा अपहार झाल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला. त्यासाठी तत्कालीन सरपंच, ग्रामकोष समितीचे अध्यक्ष व सदस्यासह ग्राम सचिवांना जबाबदार धरण्यात आले आहे. सदर अपहाराची रक्कम येत्या ३० जूनपर्यंत संबंधित लेखाशिर्षात जमा करण्याचे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी (पंचायत) त्यांना दिले आहे.
या अपहारात पेठा येथील अपहार ४१ लाखांचा तर तोडका येथील अपहार ६.४ लाखांचा आहे. जिल्हा परिषदेचे सहायक गटविकास अधिकारी (पंचायत) यांनी यासंदर्भातील अहवाल दिला होता. त्यानंतर संबंधितांना यापूर्वी नोटीसही बजावण्यात आल्या. मात्र त्याला प्रतिसाद न मिळाल्यामुळे आता अंतिम नोटीस बजावण्यात आली आहे. अपहाराची रक्कम संबंधितांनी ३० जूनपर्यंत जमा न केल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई होणार आहे.
चौकशी अहवालानुसार, पेठा ग्रामकोष समितीचे अध्यक्ष चंद्रय्या भिमय्या तेलांम आणि सदस्य सत्यमा शंकर मुलकरी यांच्या कार्यकाळात पेठा ग्रामपंचायतअंतर्गत मौजा पेठा येथे ५ टक्के अबंध निधी, तेंदू बोनस आणि बिज भांडवलअंतर्गत मुरूम टाकण्याच्या कामात ५ लाख रुपये, सार्वजनिक विहिरीतील गाळ काढण्याच्या कामात १.५ लाख तर एलईडी दिवे बसविण्याच्या कामात २५ लाख ५९ हजार ४४० रुपयांचा अपहार झाला. त्यासाठी तेलांम आणि मुलकरी यांच्यासह तत्कालीन सचिव एच.एस.भारूडे यांना समप्रमाणात जबाबदार धरण्यात आले.
पेठा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी निला ऋषी पोरतेट असताना गाव नक्षलबंदी योजनेअंतर्गत २ लाख ७५ हजार २११ रुपये आणि १४ व्या वित्त आयोगातील योजनेअंतर्गत केलेल्या केलेल्या विकास कामात ६ लाख ४१ हजार २०० अशा एकूण ९ लाख १६ हजार ४११ रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा ठपका ठेवण्यात आला. त्यासाठी तत्कालीन सरपंच पोरतेट यांच्यासह तत्कालीन सचिव एच.एस. भारूडे यांना समप्रमाणात जबाबदार धरण्यात आले.
मौजा तोडका (स) येथे ५ टक्के अबंध निधी, तेंदू बोनस आणि बिज भांडवलअंतर्गत एलईडी दिवे बसविण्याच्या कामात ५ लाखांचा अपहार केल्याचा ठपका चौकशी अहवालात ठेवण्यात आला. त्यासाठी ग्रामकोष समितीचे अध्यक्ष हनमंतू निमय्या सोयाम आणि सदस्य अनिता रत्नाय्या सडमेक यांच्या तत्कालीन सचिव एच.एस. भारूडे यांना जबाबदार धरण्यात आले. याशिवाय सोलर ईन्वर्टर बसविण्याच्या कामात १ लाख ४० हजार रुपयांचा अपहार केल्याचा ठपका तोडका (म) ग्रामकोष समितीचे अध्यक्ष रमेश किष्टय्या सडमेक व सदस्य कमला रोशय्या सडमेक यांच्यासह तत्कालीन सचिव भारूडे यांच्यावर ठेवण्यात आला. याप्रकरणी फौजदारी कारवाई का करण्यात येऊ नये? याचा खुलासा करून अपहाराची रक्कम तत्काळ जमा करण्याचे निर्देश उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे.

Web Title: Embezzlement of Rs. 47 lakhs in Petha Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.