वीज कोसळून शेतकरी गंभीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2016 02:48 IST2016-06-13T02:48:02+5:302016-06-13T02:48:02+5:30
शेतात पेरणी करीत असताना वीज कोसळल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नरोटी चक येथे घडली.

वीज कोसळून शेतकरी गंभीर
नरोटी चक येथील घटना : उपजिल्हा रूग्णालयात उपचार सुरू
आरमोरी : शेतात पेरणी करीत असताना वीज कोसळल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास नरोटी चक येथे घडली. सोमा सुकाजी कुमरे (५५) रा. नरोटी चक असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
तालुक्यातील सिर्सी गट ग्रामपंचायती अंतर्गत असलेल्या नरोटी चक येथील शेतकरी सोमा कुमरे हे आपल्या शेतात धान पेरणीसाठी गेले. धानाची पेरणी करीत असताना दुपारी अचानक मेघ गर्जनेसह वादळी पाऊस सुरू झाला. पेरणी आटोपून नांगराला जुंपलेले बैल सोडून कुमरे हे घरी जायला निघाले. दरम्यान त्यांच्या जवळ वीज कोसळली. विजेच्या तीव्रतेने ते गंभीर जखमी झाले. दोन्ही बैल घरी पोहोचले. शेतकरी कुमरे बराच वेळ घरी पोहोचले नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियासह गावातील उपसरपंच विश्वेसर दर्रो, चंदलाल बनकर, निकेश कुमरे, मोतीराम दर्रो, विजय उसेंडी, मारोती दर्रो हे शेतात जाऊन पाहिले असता, सोमा कुमरे हे बेशुध्द अवस्थेत शेतात पडलेले दिसले. लगेच त्यांना खासगी वाहनाने आरमोरीच्या उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमीवर उपचार सुरू असून या घटनेची माहिती मिळताच वैरागड सर्कलचे मंडळ अधिकारी घरत यांनी उपजिल्हा रूग्णालयात जाऊन जखमी शेतकऱ्याची भेट घेतली. जखमी शेतकऱ्याला आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आहे. (वार्ताहर)