पाच नगरपंचायतींच्या सभापतींची निवडणूक २ डिसेंबरला
By Admin | Updated: November 28, 2015 02:44 IST2015-11-28T02:44:18+5:302015-11-28T02:44:18+5:30
गुरूवारी पार पडलेल्या पाच नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीनंतर आता या नगरपंचायतींच्या स्थायी समित्या...

पाच नगरपंचायतींच्या सभापतींची निवडणूक २ डिसेंबरला
पहिला टप्पा : कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली व अहेरी
गडचिरोली : गुरूवारी पार पडलेल्या पाच नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडणुकीनंतर आता या नगरपंचायतींच्या स्थायी समित्या व विषय समित्या गठित करुन त्यांचे सभापती निवडणे तसेच दोन नामनिर्देशित सदस्यांची निवड करण्यासाठी २ डिसेंबरला विशेष सभा बोलावण्याचे आदेश गडचिरोलीचे जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी जारी केले आहेत.
गुरूवारी २६ नोव्हेंबर रोजी कोरची, धानोरा, मुलचेरा, एटापल्ली व अहेरी नगरपंचायतींच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदांची निवडणूक पार पडली. आता २ डिसेंबरला या पाच नगरपंचायतींच्या स्थायी समित्या, विषय समित्या, त्यांचे सभापतीं व नामनिर्देशित सदस्यांची निवडप्रक्रिया होणार आहे. त्यासाठी २ डिसेंबरला सकाळी १० वाजता संबंधित नगरपंचायतीच्या सभागृहात विशेष सभा बोलावण्यात आली आहे. या सभेत सकाळी १० ते दुपारी १२ वाजतापर्यंत दोन नामनिर्देशित सदस्यांची निवड करावयाची आहे. त्यानंतर स्थायी समिती व विषय समित्यांच्या सदस्यांची संख्या ठरवायची आहे. तसेच नगरपंचायत उपाध्यक्ष हे कोणत्या समितीचे सभापती राहतील, हेदेखील याचवेळी ठरवायचे आहे. त्यानंतर दुपारी १२ ते २ वाजतापर्यंत विषय समित्या व स्थायी समितीच्या निवडणुकीकरिता संबंधित सदस्यांनी सहायक पीठासीन अधिकाऱ्यांकडे (तहसीलदार) नामनिर्देशनपत्र सादर करावयाचे आहे. त्यानंतर दुपारी २ वाजता विषय समित्यांची निवड केली जाईल. त्यानंतर त्यांच्या सभापतींची निवडणूक होईल. त्यानंतर महिला व बालकल्याण समितीच्या उपसभापतीची निवडणूक घेण्यात येईल.
सर्वांत शेवटी स्थायी समिती गठित करण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी रणजितकुमार यांनी दिली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)