अर्थवायर तुटल्याने आठ तालुके अंधारात
By Admin | Updated: May 15, 2017 01:28 IST2017-05-15T01:28:26+5:302017-05-15T01:28:26+5:30
चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील २२० केव्हीच्या उपकेंद्रातील अर्थवायर तुटल्याने शनिवारच्या रात्री

अर्थवायर तुटल्याने आठ तालुके अंधारात
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदूर येथील २२० केव्हीच्या उपकेंद्रातील अर्थवायर तुटल्याने शनिवारच्या रात्री गडचिरोली जिल्ह्यातील आठ तालुके व चंद्रपूर जिल्ह्यातील जवळपास सहा तालुके अंधारात सापडले होते.
गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा, गडचिरोली, चामोर्शी, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी, मुलचेरा या आठ तालुक्यांना चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदू येथील २२० केव्हीच्या वीज उपकेंद्रातून विजेचा पुरवठा केला जातो. चंद्रपूर जिल्ह्यात शनिवारच्या रात्री मोठ्या प्रमाणात वादळ झाले. या वादळामुळे रात्री ११.४५ वाजता टॉवर लाईनवरील एका खांबाजवळील अर्थवायर तुटले. त्यामुळे गडचांदूर सबस्टेशनमधून वीज पुरवठा होणाऱ्या गडचिरोली, धानोरा, चामोर्शी, मुलचेरा, भामरागड, अहेरी, एटापल्ली, सिरोंचा या तालुक्यांमधील वीज पुरवठा खंडीत झाला. त्याचबरोबर चंद्रपूर जिल्ह्यातील मूल, सावली, राजुरा, गडचांदूर, गोंडपिपरी, पोंभुर्णा या तालुक्यांमधीलही वीज पुरवठा खंडीत झाला. अर्थवायर तुटला असल्याचे लक्षात येताच वीज कर्मचाऱ्यांनी रात्रभर परिश्रम घेऊन अर्थवायर जोडले. त्यानंतर जवळपास पहाटे ५.४५ वाजता वीज पुरवठा सुरळीत झाला.
मे महिन्यापासून तापमानात प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. प्रत्येकांच्या घरी कुलर, एसी आदी साधनांचा वापर केला जात आहे. अशातच रात्रीच्या सुमारास वीज पुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले.