मेळाव्यात आठ नागरिकांनी परत केल्या भरमार बंदुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2016 02:20 IST2016-11-13T02:20:32+5:302016-11-13T02:20:32+5:30
ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या परिसरात ११ नोव्हेंबर रोजी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

मेळाव्यात आठ नागरिकांनी परत केल्या भरमार बंदुका
भामरागड : ताडगाव पोलीस मदत केंद्राच्या परिसरात ११ नोव्हेंबर रोजी जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यादरम्यान सुमारे आठ नागरिकांनी भरमार बंदुका पोलिसांकडे सुपूर्द केल्या आहेत.
मेळाव्याला ताडगावचे पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी पीएसआय महारूद्र परजने, लालसू मादी आत्राम, सीआरपीएफचे पोलीस निरीक्षक मीना, एसआरपीएफचे चव्हाण, पीएसआय संदीप पाटील उपस्थित होते.
ताडगाव परिसरातील ग्रामीण भागातील जवळपास १ हजार नागरिक उपस्थित होते. या मेळाव्यादरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर ५०० व १०० रूपयांचा नोटा बंद झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीबाबतही मार्गदर्शन केले. नागरिकांनी नक्षल्यांचे पैैसे स्वीकारू नये, तसेच सदर पैैसे आपल्या बँक खात्यावर जमा करू नये याबाबत नागरिकांना सजग करण्यात आले. वृद्ध व गरीब नागरिकांना साडीचोळी, भांडे व दैैनंदिन वापराच्या वस्तू भेट देण्यात आल्या.
परिसरातील ज्या नागरिकांकडे भरमार बंदुका आहेत त्या त्यांनी पोलिसांकडे जमा कराव्या, संबंधितांवर कोणतीही कारवाई केली जाणार नाही, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आठ नागरिकांनी भरमार बंदुका जप्त केल्या. बंदुक असल्यामुळे नक्षलवादी वारंवार सेंट्री म्हणून घेऊन जातात. शिकार करताना वन विभाग व पोलिसांकडून पकडले जाण्याची शक्यतासुद्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही स्वत:हून भरमार बंदुका सुपूर्द करीत असल्याचे नागरिकांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)