कन्हैया शिकार प्रकरणात आठ आरोपीस अटक व सुटका
By Admin | Updated: November 21, 2015 02:01 IST2015-11-21T02:01:36+5:302015-11-21T02:01:36+5:30
गडचिरोली वनपरिक्षेत्रांतर्गत वैनगंगा नदी पारडी-कनेरी घाटावर कन्हैया पक्ष्यांची शिकार करणाऱ्या दोन इसमांना १७ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती.

कन्हैया शिकार प्रकरणात आठ आरोपीस अटक व सुटका
पारडी कुपीचे आरोपी : २४४ पक्ष्यांना केले ठार
गडचिरोली : गडचिरोली वनपरिक्षेत्रांतर्गत वैनगंगा नदी पारडी-कनेरी घाटावर कन्हैया पक्ष्यांची शिकार करणाऱ्या दोन इसमांना १७ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली होती. त्यांनी २४४ पक्ष्यांची शिकार केल्याचे स्पष्ट झाले होते. अटक करण्यात आलेल्या इसमाची कसून चौकशी केल्यानंतर या प्रकरणात आठ आरोपींना अटक करण्यात आली. त्यांना १९ नोव्हेंबर रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी गडचिरोली यांच्या न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
१७ नोव्हेंबर रोजी कन्हैया पक्ष्याच्या शिकार प्रकरणात धोंडू गेडाम व किसन मेश्राम या दोन संशयीताच ताब्यात घेण्यात आले होते. त्यांची चौकशी वनाधिकाऱ्यांनी केल्यावर १८ व १९ नोव्हेंबर रोजी या प्रकरणात मधुकर पत्रू मेश्राम, पांडुरंग सितकुरा भोयर, बाबुराव नारायण मेश्राम, रमेश सीताराम कोल्हे, बाबुराव दादाजी भोयर, तरकडू लहानू गेडाम, उमाजी गणपत भोयर, राजू कुकसू गेडाम रा. सर्व पारडी कुपी यांना अटक करण्यात आली. या सर्वांनी चवडीचे साहित्य, बांबू काठ्या, नायलॉन दोऱ्या व पक्षी ठेवण्यासाठी उपयोगात येणाऱ्या घुटी व बेंदवा यांचा वापर केला. हे साहित्यही जप्त करण्यात आले. सदर सर्व आरोपींना १९ नोव्हेंबर रोजी प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांनी जामीन मंजूर केला.
सदर कारवाई सहाय्यक वनसंरक्षक (संरक्षण व अतिक्रमण निर्मूलन) मोहन नाईकवाडी यांच्या मार्गदर्शनात वनपाल एम. एल. गोडसेलवार, एन. एच. बन्सोड, एस. एम. धात्रक, वनरक्षक आर. टी. समर्थ, एस. जी. चंदेल, आर. एम. आनंदपवार, एफ. एल. गड्डमवार, डी. एम. सहारे, के. एन. दोडके यांनी पार पाडली. यामुळे शिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)