बालकांना मिळणार अंडी व केळी
By Admin | Updated: April 5, 2015 01:46 IST2015-04-05T01:46:59+5:302015-04-05T01:46:59+5:30
जिल्ह्यात कुपोषणाची समस्या तीव्र आहे. जिल्ह्यातील ४.१६ टक्के बालके अतितीव्र तर १६.६४ बालके साधारण कुपोषीत आहेत.

बालकांना मिळणार अंडी व केळी
गडचिरोली : जिल्ह्यात कुपोषणाची समस्या तीव्र आहे. जिल्ह्यातील ४.१६ टक्के बालके अतितीव्र तर १६.६४ बालके साधारण कुपोषीत आहेत. कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने नवे पाऊल उचलले आहे. यानुसार आता जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी केंद्रातील सर्व बालकांना आठवड्यातून दोन दिवस अंडी व केळी मिळणार आहेत. या नव्या योजनेसाठी जिल्हा परिषदेला निधी प्राप्त झाला असल्याची माहिती आहे.
अंगणवाडी केंद्रात येणाऱ्या बालके साधारण व सर्वसाधारण कुटुंबातील असतात. आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्याने अशा कुटुंबातील बालकांना घरून प्रोटिनयुक्त आहार मिळत नाही. परिणामी कुपोषणाची समस्या उद्भवते. भावी पिढी निरोगी व सुदृढ निर्माण होण्यासाठी बालकांना योग्य आहार मिळणे गरजेचे आहे. अंगणवाडी केंद्रातील बालकांना प्रोटिनयुक्त आहार मिळावा, तसेच त्यांच्या वजनात वाढ व्हावी, या उद्देशाने राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाने वर्षाच्या अखेरीस महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रातील तीन ते सहा वयोगटातील बालकांना आठवड्यातून दोन दिवस अंडी व केळी देण्याची योजना एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून राबविण्यात येणार आहे. प्रती मुलगा, प्रती दिवस पाच रूपये प्रमाणे महिना भराच्या खर्चाचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या योजनेसाठी अनुदान मिळणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण एक हजार ७७१ अंगणवाडी केंद्र आहेत. या अंगणवाडी केंद्रात जवळपास ३० हजार बालके पूर्व प्राथमिक शिक्षण घेत आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)