शैक्षणिक समस्या मार्गी लावणार
By Admin | Updated: December 22, 2014 22:47 IST2014-12-22T22:47:53+5:302014-12-22T22:47:53+5:30
सिरोंचा तालुक्यात शिक्षकांचे रिक्त पदे, अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. शाळांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या भागात शैक्षणिक विकास माघारलेला आहे.

शैक्षणिक समस्या मार्गी लावणार
सिरोंचा : सिरोंचा तालुक्यात शिक्षकांचे रिक्त पदे, अनेक शाळांच्या इमारती मोडकळीस आल्या आहेत. शाळांमध्ये मूलभूत सोयीसुविधांचा अभाव आहे. त्यामुळे या भागात शैक्षणिक विकास माघारलेला आहे. या भागातील शैक्षणिक मागासलेपण दूर करण्यासाठी समस्या मार्गी लावणार अशी ग्वाही आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी दिली. तालुक्यातील असरअल्ली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शताब्दीपूर्ती व स्रेहमिलन सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिरोंचा पंचायत समितीच्या सभापती लालुबाई मडावी होत्या. प्रमुख अतिथी म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शंकर मडे, असरअल्लीचे सरपंच लक्ष्मण सिडाम, सिरोंचाचे उपवनसंरक्षक प्रभूनाथ शुक्ला, अहेरीचे उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील, तहसीलदार केशव मिश्रा, संवर्ग विकास अधिकारी पांडुरंग मरस्कोल्हे, गट शिक्षणाधिकारी पी. पी. पालगावकर, उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी पवार, असरअल्लीचे ठाणेदार खाटपे, जि. प. सदस्य व्यंकटेश शानगोंडा, पं. स. सदस्य कलावती झोडे, विश्वनाथम जैन, गजानन कलाक्षपवार, सर्वेश्वर गुडुरी आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविकेतून शिक्षक खुर्शीद शेख यांनी असरअल्ली जि. प. शाळेची स्थापना १९१४ मध्ये सी. पी. अॅन्ड बेरारच्या काळात झाली, असे सांगितले. तसेच या शाळेच्या संरक्षण भिंती व इतर सुविधांसाठी शासन व प्रशासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणीही शेख यांनी यावेळी केली. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते या शाळेचे माजी विद्यार्थ्यांचा श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये समय्या सुव्वा, कोंडय्या पेंड्याला, विश्वनाथम जैन, रामवर्धन पडीशाला, राघवूलू जैन, विठ्ठल फकीर, सतिश जैन, भीमया धरणी, भूपती मोगलेश्वर, सीरिया सिडाम, लक्ष्मण राजू आदींचा समावेश आहे. कार्यक्रमाचे आभार मुख्याध्यापक आर. बी. दहागावकर यांनी मानले. कार्यक्रमाला बहुसंख्येने आजी, माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)