शिक्षणाधिकारी शाळांवर धडकले
By Admin | Updated: October 20, 2014 23:11 IST2014-10-20T23:11:03+5:302014-10-20T23:11:03+5:30
जि. प. च्या शिक्षण विभागामार्फत गेल्या पाच-सहा महिन्यांपासून अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक संस्थाचालक अतिरिक्त शिक्षक

शिक्षणाधिकारी शाळांवर धडकले
समायोजन : जिल्ह्यात ४३४ अतिरिक्त शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी
दिलीप दहेलकर - गडचिरोली
जि. प. च्या शिक्षण विभागामार्फत गेल्या पाच-सहा महिन्यांपासून अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. मात्र जिल्ह्यातील अनेक संस्थाचालक अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आपल्या संस्थेच्या अधिनस्त शाळेत सामावून घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे खुद्द शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी सोमवारी शाळांवर धडक देऊन दोन अतिरिक्त कर्मचाऱ्यांचे समायोजन केले.
सन २०११ मध्ये गडचिरोली जिल्ह्यासह संपूर्ण राज्यभरात सर्व शाळांमध्ये विशेष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत अनेक शाळांमधील वर्गांची पटसंख्या कमी आढळून आली. पटसंख्या कमी आढळून आलेल्या शाळेतील काही शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्यात आले. मात्र कोणते कर्मचारी अतिरिक्त ठरवायचे, हे संस्थांनीच निश्चित करावेत, असेही शिक्षण विभागाचे निर्देश आहेत.
पटपडताळणी मोहिमेदरम्यान पटसंख्या कमी आढळून आल्यामुळे जिल्ह्यातील १७३ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. तसेच ३६१ शिक्षकेत्तर कर्मचारीही अतिरिक्त झाले असल्याची माहिती आहे. अतिरिक्त झालेल्या १७३ शिक्षकांमध्ये इयत्ता ५ वी ते १२ वीपर्यंत अध्यापन करणाऱ्या खासगी अनुदानित माध्यमिक तसेच प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. एकूण ४३४ अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांपैकी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने गेल्या काही दिवसात १४ शिक्षकांचे संस्थेच्या स्तरावर समायोजन केले आहे. आता अतिरिक्त ठरलेल्या २५ शिक्षकांची यादी निश्चित करण्यात आली असून या शिक्षकांचे २८ आॅक्टोबरपर्यंत शिक्षण विभागाच्यावतीने समायोजन पूर्ण करणार असल्याची माहिती शिक्षण विभागाच्या सुत्रांकडून मिळाली आहे.
जिल्ह्यातील १०० ते १२५ अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्याचे शिक्षण विभागाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. यासाठी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाचा आधार घेण्यात येणार आहे. २०१५ च्या जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात जिल्ह्यातील अनेक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी सेवानिवृत्त होणार आहे. त्यानंतर रिक्त झालेल्या जागी जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन करण्यात येणार असल्याची माहितीही सुत्रांकडून मिळाली आहे.
अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन व वेतन अदा करण्याबाबत १४ आॅक्टोबर २०१४ रोजी शालेय शिक्षण विभागाने परिपत्रक काढले आहे. या परिपत्रकानुसार अतिरिक्त शिक्षकांना सामावून न घेणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाणार आहे. अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे वेतन कोणत्याही परिस्थितीत थांबवू नये, या कर्मचाऱ्यांना नियमित वेतन देण्यात यावे, यासाठी मंत्रालयात राज्याच्या शालेय शिक्षण सचिव अश्विनी भिडे यांची भेट घेऊन शिक्षक आमदारांनी चर्चा केली होती. या चर्चेदरम्यान शालेय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी भिडे यांनी समायोजन न झालेला एकही शिक्षक वेतनापासून वंचित राहणार नसून त्यांना नियमित वेतन दिले जाईल व इतर शाळांमध्ये अशा कर्मचाऱ्यांना सामावून घेतले जाईल, असे आश्वासन दिले होते. त्या अनुषंगाने शालेय शिक्षण विभागाने १४ आॅक्टोबर रोजी परिपत्रक काढून जिल्ह्यासह राज्यभरातील हजारो शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. सर्व जिल्ह्याच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी तातडीने अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, असे निर्देशही या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत. या संदर्भात शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांच्याशी संपर्क साधला असता, दोन अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे समायोजन केल्याच्या बाबीला त्यांनी दुजोरा दिला.