शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांची लातूर येथे बदली

By Admin | Updated: July 2, 2015 02:05 IST2015-07-02T02:05:15+5:302015-07-02T02:05:15+5:30

गडचिरोली येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड यांची गडचिरोली येथून लातूर येथे शिक्षणाधिकारी (निरंतर) या पदावर बदली झाली आहे.

Education Officer Ulhas Narad shifted to Latur | शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांची लातूर येथे बदली

शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांची लातूर येथे बदली

बदलीमुळे जिल्ह्यात असंतोष : जिल्ह्यातील विविध संघटना आंदोलनाच्या पावित्र्यात
गडचिरोली : गडचिरोली येथील शिक्षणाधिकारी (माध्यमिक) उल्हास नरड यांची गडचिरोली येथून लातूर येथे शिक्षणाधिकारी (निरंतर) या पदावर बदली झाली आहे. बुधवारी याबाबतचा बदली आदेश गडचिरोली जिल्हा परिषदेत धडकला. त्यांच्या जागी पुणे येथून आत्राम नावाचे नवे शिक्षणाधिकारी येत आहेत. आत्राम हे मागील दहा वर्षांपूर्वी जिल्ह्यात होते, अशी माहिती मिळाली आहे.
उल्हास नरड हे मागील तीन वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात शिक्षणाधिकारी माध्यमिक व प्राथमिक या दोन्ही विभागाची जबाबदारी सांभाळत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात विद्यार्थ्यांसाठी तीन तास टीव्ही बंद, एक झाड एक विद्यार्थी आदी उपक्रम राबवून जिल्ह्यात अतिशय चांगले काम केले होते. त्यांच्या बदलीमुळे जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वी त्यांची बदली करण्यात आल्याने जिल्ह्याच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ माजली असून त्यांची बदली करण्याच्या मागणीसाठी विविध संघटना रस्त्यावर उतरणार असल्याची माहिती आहे.
स्थानिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक विभागाचे कर्तव्यदक्ष शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांचा जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे लातूर येथे निरंतर शिक्षणाधिकारी म्हणून स्थानांतरण करण्यात आल्याने जिल्ह्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (कवाडे गट) यांच्यासह विविध संघटना शिक्षणाधिकारी नरड यांचे स्थानांतरण रद्द करण्यासाठी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांनी जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा उंचाविण्यासाठी भरीव कार्य केले आहे. गाव तिथे बंधारा निर्मितीचा उपक्रम राबवून जलसंधारणाचा संदेश प्रत्येक गावात पोहोचविला. त्यांच्या या कार्याची दखल राज्य शासनाने सुद्धा घेतली होती. कॉपीमुक्त अभियान, शैक्षणिक शिस्त, इन्स्पायर अवॉर्ड प्रदर्शन आदी उपक्रमातून नरड यांनी शिक्षण विभागात आमुलाग्र कार्य केले आहे. नरड यांच्या कार्यकाळात यंदा दहावी, बारावीचा जिल्ह्याचा निकालही अधिक लागला. अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा दोन वर्षांचा कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे स्थांनातरण केल्याने जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला खिळ बसणार आहे.
नरड यांनी संपूर्ण जिल्हाभर राबविलेल्या उपक्रमामुळे राज्यात जिल्ह्याचा नावलौकीक झाला आहे. त्यामुळे शिक्षणाधिकारी नरड यांची बदली रद्द करून त्यांना जिल्ह्यातच कार्यरत ठेवावे, अशी मागणी पिरीपाचे जिल्हाध्यक्ष मुनीश्वर बोरकर, युवाशक्ती संघटनेचे नेते तथा नगर पालिकेचे गटनेते प्रा. राजेश कात्रटवार, नं. प. चे उपाध्यक्ष प्रा. रमेश चौधरी, नगरसेवक नंदू कायरकर आदींनी केली आहे. शिक्षणाधिकारी नरड यांची बदली रद्द न झाल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. राजकीय, सामाजिक संघटनेसोबतच जिल्ह्यातील काही शिक्षक संघटना शिक्षणाधिकारी नरड यांची बदली रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणार आहेत. यासाठी शिक्षक संघटना तयारीही करीत आहेत. बदली रद्द करण्यासाठी प्रशासन व शासनस्तरावर विविध संघटनांकडून प्रयत्न होणार आहेत.

Web Title: Education Officer Ulhas Narad shifted to Latur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.