अहेरीत पाणी नमुने तपासणीला कोरोनाचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:01:03+5:30

सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांच्या स्त्रोतातील पाण्याचे नमूने तपासून स्त्रोताचे क्लोरिनेशन केले जाते. गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी मान्सूनपूर्वी व मान्सूनंतर अशा प्रकारे दोनवेळा पाण्याचे नमुने घेऊन तपासणी केली जाते. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाणी नमुने तपासणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत १५ हजार ३३८ नमूने घेण्यात आले. मात्र केवळ ५ हजार ५०९ नमुन्यांचीच तपासणी करण्यात आली.

Eclipse of corona for inspection of water samples in Aheri | अहेरीत पाणी नमुने तपासणीला कोरोनाचे ग्रहण

अहेरीत पाणी नमुने तपासणीला कोरोनाचे ग्रहण

Next
ठळक मुद्देदिरंगाई चव्हाट्यावर : मान्सूनपूर्व जलतपासणीची कामे अर्धवट

विवेक बेझलवार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अहेरी : दूषित पाण्यामुळे जलजन्य आजार वाढू नये यासाठी ग्रामपंचायतस्तरावर हातपंप, विहीर व इतर स्त्रोतातील पाणी नमुने घेऊन जिल्हा आणि उपविभाग स्तरावरील प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. दरवर्षी मान्सूनपूर्व पाणी नमुने तपासणीसाठी पाठविले जातात. मात्र यंदा कोरोनाच्या संचारबंदीमुळे अहेरी उपविभागातील अनेक ठिकाणचे पाणी नमुने प्रयोगशाळेत पोहोचलेच नाही. जे पोहोचले त्यांची तपासणी मोजक्याच प्रमाणात झाली. परिणामी जून महिना सुरू होऊनही मान्सूनपूर्व जलतपासणी अर्धवट आहे.
सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांच्या स्त्रोतातील पाण्याचे नमूने तपासून स्त्रोताचे क्लोरिनेशन केले जाते. गडचिरोली जिल्ह्यात दरवर्षी मान्सूनपूर्वी व मान्सूनंतर अशा प्रकारे दोनवेळा पाण्याचे नमुने घेऊन तपासणी केली जाते. जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाणी नमुने तपासणीचे काम सुरू आहे. आतापर्यंत १५ हजार ३३८ नमूने घेण्यात आले. मात्र केवळ ५ हजार ५०९ नमुन्यांचीच तपासणी करण्यात आली. आणखी १० हजार नमुन्याची तपासणी झाली नसून जलस्त्रोताचे क्लोरिनेशनही होऊ शकले नाही. अशा स्थितीत पावसाचे आगमन झाल्याने गावातील जलस्त्रोत स्वच्छ ठेवण्याची ग्रामपंचातीची जबाबदारी वाढली आहे.
गावागावातील जलसुरक्षा रक्षक पाणी नमुने घेऊन ते जिल्हा तसेच तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या प्रयोगशाळांमध्ये पाठवितात. या प्रयोगशाळांमध्ये भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेच्या माध्यमातून पाणी नमुन्यांची रासायनिक व अनुजैविक तपासणी होते. अनुजैविकदृष्ट्या पाणी नमुने अयोग्य आढळून आल्यास २४ तासाच्या आत संबंधित ग्रामपंचायतीला माहिती दिली जाते. सदर पाणी नमुन्यांचे घटकनिहाय अहवाल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी व गटविकास अधिकारी तसेच ग्रामपंचायतींना दिले जातात.

वाहतुकीच्या साधनाअभावी रखडले काम?
जिल्हा मुख्यालय गडचिरोली येथे जिल्हास्तरिय प्रयोगशाळा तर अहेरी, आरमोरी, चामोर्शी, कुरखेडा येथे उपविभागस्तरावर प्रयोगशाळा आहे. जिल्ह्यातील १५ हजार ३३८ पाणी नमुने घेण्यात आले आहेत. यात सर्वाधिक अहेरी उपविभागस्तरावरील प्रयोगशाळेत ४ हजार २२७ पाणी नमुने आहेत. सदर पाणी नमुने चार तालुक्यातील मिळून आहेत. चामोर्शी उपविभागीय प्रयोगशाळेत ३ हजार ७२८, गडचिरोली जिल्हास्तरावरील प्रयोगशाळेत ३ हजार ७, कुरखेडा उपविभागीय प्रयोगशाळेत २ हजार ४८८ व आरमोरी उपविभागीय प्रयोगशाळेत १ हजार ८२८ पाणी नमुने तपासणी आले आहेत. पण अहेरी उपविभागातील अर्धेअधिक पाणी नमुने प्रयोगशाळांमध्ये पोहोचलेच नाही. संचारबंदीत वाहतुकीची साधने नसल्याने जलसुरक्षा रक्षकांना हे नमुने नेता आले नसल्याची चर्चा आहे.

कोरोनाच्या संचारबंदीमुळे प्रयोगशाळेत पाणी नमुने पोहोचविता आले नाही. संचारबंदीच्या काळात वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध झाली नाही. त्यामुळे पाणी नमुने तपासणीचे काम थंडावले. आता जलसुरक्षा रक्षकांनी लवकरात लवकर पाणी नमुने प्रयोगशाळेत घेऊन यावे. १५ दिवसांत तपासणी करून आकडेवारीत सुधारणा करता येईल. गावातील जलस्त्रोत सुरक्षित ठेवावे. पाणी दूषित होणार नाही याची काळजी सर्व ग्रामपंचायतींनी घ्यावी.
- प्रशांत गोलंगे, वरिष्ठ भूवैज्ञानिक,
भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा, गडचिरोली

Web Title: Eclipse of corona for inspection of water samples in Aheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.