मंदिराचा पूर्व भाग नदीत गडप होण्याची शक्यता
By Admin | Updated: February 20, 2017 00:39 IST2017-02-20T00:39:48+5:302017-02-20T00:39:48+5:30
विदर्भाची काशी म्हणून सर्वदूर परिचीत असलेल्या मार्कंडेश्वर मंदिराच्या पूर्वेकडील भागावरील माती नदीपात्रात सरकत चालली आहे.

मंदिराचा पूर्व भाग नदीत गडप होण्याची शक्यता
पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष : मार्कंडात वैनगंगेच्या प्रवाहाने माती वाहून जात आहे
संतोष सुरपाम मार्कंडादेव
विदर्भाची काशी म्हणून सर्वदूर परिचीत असलेल्या मार्कंडेश्वर मंदिराच्या पूर्वेकडील भागावरील माती नदीपात्रात सरकत चालली आहे. त्यामुळे हा भाग वैनगंगा नदीत गडप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे पुरातत्व विभागाने लक्ष देऊन तत्काळ नदी किनाऱ्याला संरक्षक भिंत बांधावी, अशी मागणी होत आहे.
मार्कंडेश्वर मंदिर समूह अत्यंत प्राचिन असून सदर मंदिर वैनगंगा नदीच्या अगदी काठावर वसलेला आहे. या ठिकाणी उत्तरवाहिणी वैनगंगा नदी आहे. नदी किनारा ते मंदिर परिसर या भागात संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नाही. मंदिराच्या पूर्वेकडील वैनगंगा नदीमध्ये उतरल्यानंतर खडकावरून अवलोकन केल्यास पाण्याच्या प्रवाहाने दरवर्षी नदी पात्र कोसळत असल्याचे दिसून येत आहे. पूर्वेकडील भागाला संरक्षक भिंत, पायऱ्या व दगडाची पिंचींग करणे आवश्यक आहे. असे न करण्यात आल्याने प्राचिन मंदिर नदीमध्ये गडप होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत पुरातत्व विभाग व जिल्हाधिकारी कार्यालय यांनी पूर्वेकडील भागाची पाहणी करून येथे संरक्षक भिंतीचे काम करावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे. सध्या या प्राचिन मंदिराच्या जीर्णोध्दाराचे काम सुरू असून देवालय सुस्थितीत आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे हे मंदिर अमूल्य ठेवा असून तो व्यवस्थित ठेवण्यासाठी पुरातत्व विभागाने आवश्यक ती पावले उचलावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दरवर्षी वैनगंगा नदीला मोठा पूर येतो. या पुरात माती वाहून जात आहे व खडक उघडे पडत आहेत. नदीच्या किनाऱ्याला लागूनच मंदिर असल्याने हळूहळू माती खचू लागली आहे. त्यामुळे या भागात संरक्षक भिंत उभारणे गरजेचे झाले आहे.