पावणेअठरा लाख महिलांना रोजगार

By Admin | Updated: April 6, 2015 01:32 IST2015-04-06T01:32:30+5:302015-04-06T01:32:30+5:30

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१४- १५ या वर्षात ३१ लाख ६२ हजार ३६४ मनुष्य दिवस

Earning employment for half a million women | पावणेअठरा लाख महिलांना रोजगार

पावणेअठरा लाख महिलांना रोजगार

वर्षभरात : रोजगार हमी योजना ठरली जिल्ह्यातील मजुरांसाठी नवसंजीवनी
गडचिरोली :
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत २०१४- १५ या वर्षात ३१ लाख ६२ हजार ३६४ मनुष्य दिवस रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी ३९ लाख ५९ हजार १८२ मनुष्य दिवस रोजगार निर्मिती झाली. वर्षभरात रोहयोच्या माध्यमातून जिल्ह्यातील एकूण १७ लाख ९१ हजार ४७८ महिला मजुरांना रोजगार मिळाला.
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेंतर्गत ९ हजार ३८५.९ लाख रूपयाचा आर्थिक खर्च कामावर करण्याचे उद्दिष्ट होते. यापैकी प्रशासनाने वर्षभरात ९ हजार ९४०.४७ लाख रूपये रोहयोच्या कामावर खर्च केले आहे. याची टक्केवारी १०५.९१ आहे. रोहयोच्या माध्यमातून अनुसूचित जाती, जमाती व इतर मागास प्रवर्गातील जॉबकार्डधारक मजुरांना रोजगार देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केला. वर्षभरात जिल्ह्यात एकूण ३९ लाख ८८ हजार ६५९ मजुरांना रोजगार मिळाला असून यामध्ये अनुसूचित जाती प्रवर्गातील मजुरांची संख्या ३ लाख ९२ हजार ४३० आहे. वर्षभरात जिल्ह्यातील १५ लाख ७७ हजार ५८१ आदिवासी प्रवर्गातील मजुरांना रोजगार मिळाला असल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांकडून मिळाली आहे.
इतर मागास प्रवर्गातील २० लाख १८ हजार ६३९ नागरिकांना रोहयोच्या विविध कामावर रोजगार मिळाला. प्रशासनाने २०१४- १५ या वर्षात २१ लाख ९९ हजार १८१ पुरूष व १७ लाख ९१ हजार ४७८ महिला मजुरांना रोजगार मिळाला. या रोजगाराच्या माध्यमातून जिल्ह्यातील महिला मजुरांनी आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी मोलाचा हातभार लाभला. रोहयोतून बँक खाते उघडले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

व्याजासह अतिरिक्त मजुरी देयचा परिणाम
शासनाने रोजगार हमी योजनेचे काम करणाऱ्या मजुरांना मजुरी अदा करण्यात विलंब होऊ नये, तसेच रोहयोच्या कामावरील मजुरांची संख्या वाढावी, या हेतूने गतवर्षी शासन निर्णय जारी करून मजुरी अदा करण्यास विलंब झाल्यास व्याजासह अतिरिक्त मजुरी देय असल्याचे तरतुद केली. सुरूवातीला व्याजासह अतिरिक्त मजुरीची रक्कम शासनाकडून मिळाली. मात्र त्यानंतर विलंबासाठी जबाबदार राहणाऱ्या संबंधीत यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनातून सदर अतिरिक्त मजुरी देण्याची तरतुद शासन निर्णयात केली. त्यामुळे रोहयोच्या कामावरील पुरूष व महिलांची संख्या गेल्या दोन, तीन वर्षाच्या तुलनेत २०१४- १५ या वर्षात वाढली.

Web Title: Earning employment for half a million women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.