नगर भवन बनले डम्पिंग यार्ड

By Admin | Updated: July 8, 2015 02:03 IST2015-07-08T02:03:39+5:302015-07-08T02:03:39+5:30

सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी नागरिकांना सोयीचे व्हावे, या उद्देशाने १९८७ साली बांधण्यात आलेल्या नगर भवनाकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष झाले आहे.

Dump Building became a dumping hall | नगर भवन बनले डम्पिंग यार्ड

नगर भवन बनले डम्पिंग यार्ड

देसाईगंज नगर परिषदेचे दुर्लक्ष : सभोवतालच्या नागरिकांना दुर्गंधीचा होत आहे त्रास
देसाईगंज : सामाजिक कार्यक्रम करण्यासाठी नागरिकांना सोयीचे व्हावे, या उद्देशाने १९८७ साली बांधण्यात आलेल्या नगर भवनाकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष झाले आहे. काही नागरिक या इमारतीच्या परिसरात कचरा आणून टाकत असल्याने भलेमोठे कचऱ्याचे ढिगारे निर्माण झाले असून या परिसराला डम्पिंग यार्डचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
वाढत्या शहरीकरणामुळे देसाईगंजवासीयांना सामाजिक व खासगी कार्यक्रम घेण्यासाठी जागा राहिली नव्हती. परिणामी नागरिकांना असे कार्यक्रम घेताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ही बाब लक्षात घेऊन तत्कालीन नगराध्यक्ष गोंगुमल लिलामल कुकरेजा यांनी १९८७ मध्ये सात लाख रूपये खर्चुन नगर भवनाचे बांधकाम केले. सुरुवातीच्या कालावधीत या इमारतीमध्ये अनेक छोटेमोटे कार्यक्रम घेतले जात होते. सदर इमारत अत्यंत कमी भाडेतत्त्वावर नागरिकांना उपलब्ध करून दिली जात होती. परिणामी दरदिवशीच या ठिकाणी लग्नसमारंभ, बैठका, सभा, मेळावे आयोजित केले जात होते. यापासून मिळणाऱ्या उत्पन्नातून इमारत व त्याच्या परिसराची देखभाल ठेवली जात होती.
नगरसेवकांमधील आपसी मतभेदाचा फटका या इमारतीला बसला. कालांतराने नगर परिषदेने याकडे दुर्लक्ष केले. या इमारतीची देखभाल व दुरूस्तीही केली जात नाही. नियमितपणे साफसफाई केली जात नसल्याने सभोवतालच्या परिसरात प्रचंड प्रमाणात कचरा पसरला आहे. पावसाळ्यात या कचऱ्याच्या दुर्गंधीचा त्रास सभोवतालच्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. संसर्गजन्य रोगही पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने याकडे लक्ष घालून या ठिकाणचा कचरा उचलावा, अशी मागणी करण्यात येत आहे. अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Dump Building became a dumping hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.