पाण्यासाठी वैलोचना नदी पात्रात खोदला खड्डा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2017 01:32 IST2017-05-15T01:32:34+5:302017-05-15T01:32:34+5:30
पाणी समस्येवर तात्पुरता तोडगा काढण्यासाठी वैरागड ग्रामपंचायतीने नळ योजनेच्या विहिरीजवळ यंत्राच्या सहाय्याने खड्डा खोदण्याचे काम चालू केले आहे

पाण्यासाठी वैलोचना नदी पात्रात खोदला खड्डा
वैरागडात पाणी टंचाई : ग्रामसभेच्या निर्णयाची तब्बल १५ दिवसानंतर केली अंमलबजावणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : पाणी समस्येवर तात्पुरता तोडगा काढण्यासाठी वैरागड ग्रामपंचायतीने नळ योजनेच्या विहिरीजवळ यंत्राच्या सहाय्याने खड्डा खोदण्याचे काम चालू केले आहे. त्यामुळे पाणी टंचाईपासून वैरागडवासीयांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
फेब्रुवारी महिन्याच्या प्रारंभापासूनच वैरागड येथे पाणी टंचाईचे संकट निर्माण झाले होते. मात्र ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी कोणतीच उपाययोजना केली नव्हती. १ मे च्या ग्रामसभेत पाणी प्रश्नावर खमंग चर्चा झाली. नदीमध्ये खड्डा खोदण्याचे निर्देश वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला दुसऱ्याच दिवशी दिले. मात्र १५ दिवसांच्या कालावधी नंतर ग्रामपंचायतीने १४ मे रोजी खड्डा खोदण्यास सुरूवात केली आहे. खड्डा खोदून नळ योजनेच्या विहिरीला पाणी उपलब्ध होईपर्यंत जवळपास सात ते आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. या कालावधीत एक ते दोन दिवस नळ योजना बंदही राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. या काळात पाणी संकट आणखी तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
ग्रामपंचायतीला दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत वैरागड येथील गोरजाई डोहाच्या पायथ्याशी नवीन नळ योजना मंजूर झाली आहे. त्याचा प्रारूप आराखडा तयार झाला. मात्र सरपंच, सदस्य व ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे या नळ योजनेला गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पाटनवाड्याची नळ योजना जोडण्यात आली व तयार झालेला प्रारूप आराखडा बदलला. त्यामुळे लगेच सुरू होणारी नळ योजना रखडली. २० ते २५ घरे असलेल्या पाटनवाड्यातील नागरिकांसाठी वैरागडवासीयांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या चुकीचे परिणाम वैरागडवासीयांना भोगावे लागणार आहेत. त्यामुळे वैरागडवासीयांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता एस. ए. पांडे यांना विचारणा केली असता, पाटनवाडा गावाचे नाव वगळून वैरागडची नळ योजना लवकरच सुरू केली जाईल, अशी प्रतिक्रिया दिली.
१५ दिवसांचा फार्स ठरणार खड्डा
पुढील १५ दिवसात पावसाळ्याला सुरूवात होणार आहे. पावसाचे पहिले पाणी येताच नदीमध्ये खोदलेला खड्डा वाहून जाणार आहे. त्यातही खड्डा खोदल्यानंतर पाणी पुरवठा योजनेला मुबलक पाणी उपलब्ध होण्यासाठी आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यातही एक ते दोन दिवस योजना बंद राहणार आहे. जेसीबीसाठी हजारो रूपये खर्चून खोदलेला खड्डा केवळ आठ दिवसांचा फार्स ठरणार आहे. खड्डा खोदायचाच होता तर तो एप्रिल महिन्याच्या सुरूवातीलाच खोदणे गरजेचे होते, असे नागरिकांचे म्हणणे आहे.