दोन अर्धवट पुलांमुळे ७० किमींच्या रहदारीस अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2016 01:24 IST2016-04-27T01:24:29+5:302016-04-27T01:24:29+5:30
एटापल्ली ते भामरागड या दोन तालुकास्थळातील अंतर ७० किमीचे आहे. या ७० किमीच्या मार्गावर कोठी ते गट्टा या गावांच्या दरम्यान

दोन अर्धवट पुलांमुळे ७० किमींच्या रहदारीस अडथळा
कोठी व गट्टा दरम्यानचे पूल बांधकाम अर्ध्यावरच : एटापल्ली-भामरागड दरम्यान आवागमन कठीण
भामरागड : एटापल्ली ते भामरागड या दोन तालुकास्थळातील अंतर ७० किमीचे आहे. या ७० किमीच्या मार्गावर कोठी ते गट्टा या गावांच्या दरम्यान केवळ दोन पुलांचे काम पूर्ण झाले नाही. त्यामुळे दोन तालुक्यांदरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे १८ वर्षांचा कालावधी उलटूनही या दोन्ही पुलांचे बांधकाम पूर्ण झाले नाही.
भामरागड ते एटापल्लीदरम्यान कोठी व गट्टा ही दोन गावे येतात. भामरागडपासून कोठी हे गाव २० किमी अंतरावर आहे. या मार्गावर नियमितपणे भामरागडपासून बससेवा सुरू राहते. तर एटापल्लीवरून गट्टापर्यंत ३५ किमीच्या अंतरातही बससेवा नियमितपणे सुरू राहते. फक्त गट्टा ते कोठी या १५ किमीच्या अंतरात दोन पुलांचे बांधकाम रखडले असल्याने एटापल्ली ते भामरागड दरम्यान वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे.
कोठी व गट्टा या गावांदरम्यान असलेल्या दोन नाल्यांवरील पुलांच्या बांधकामाला सन १९९६-९७ च्या दरम्यान बीआरओच्या मार्फतीने सुरू करण्यात आली होती. पिल्लरपर्यंत कामही करण्यात आले. मात्र नक्षल्यांनी धमकी दिल्याने या पुलांचे बांधकाम अर्धवट सोडून बीआरओने पळ काढला. तेव्हापासून या पुलांचे बांधकामच हाती घेण्यात आले नाही.
विकास रखडला
पुलांअभावी भामरागड तालुक्यातील कोठी परिसरातील कारमपल्ली, हलवेर, कियर, पिडमिली तसेच एटापल्ली तालुक्यातील गट्टा परिसरातील गट्टा, जांभिया, अडेंगा, सूरजागड, मंगेर, हेडरी, नेंडेर, परसलगोंदी, आलदंडी, तुमरगुंडा या गावांचा विकास रखडला आहे. या गावांमध्ये चारचाकी वाहन जाण्यास अडथळा आहे.