अवकाळी पावसाचा पिकांना फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2017 02:11 IST2017-03-08T02:11:48+5:302017-03-08T02:11:48+5:30
मंगळवारी दुपारच्या सुमारास जिल्हाभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा फार मोठा फटका रबी पिकांना बसला आहे.

अवकाळी पावसाचा पिकांना फटका
रबी पिकांचे नुकसान : जिल्हाभरात दमदार पाऊस
गडचिरोली : मंगळवारी दुपारच्या सुमारास जिल्हाभरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. याचा फार मोठा फटका रबी पिकांना बसला आहे. ढगाळ वातावरण व पावसामुळे तापमानात घट झाल्याने नागरिकांना वाढत्या उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात तूर, मूग, उडीद, जवस, पोपट, कुरता, चना, वटाणा आदी पिकांचे रबी हंगामात उत्पादन घेतल्या जाते. रबी पिकांच्या काढणीचे काम पूर्ण झाले आहे. मळणीचे काम काही शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. तर काही शेतकरी ढिग बनवून ठेवले आहेत. मंगळवारी सकाळपासूनच जिल्ह्यातील वातावरण ढगाळ होते. हवामान खात्यानेही पाऊस येण्याची शक्यता वर्तविली होती. त्यामुळे शेतकरी वर्गाने आधीच तयारी करीत पिकांच्या ढिगांवर ताडपत्री, पॉलिथीन झाकून ठेवले. परिणामी पावसामुळे पिकांचे तुलनेत कमी नुकसान झाले आहे. तरीही ज्या शेतकऱ्यांनी ढिगांवर झाकले नव्हते, त्यांचे नुकसान निश्चित आहे. देसाईगंज, आरमोरी, चामोर्शी, लखमापूर बोरी, परिसरात दमदार पाऊस झाला. लखमापूर बोरी परिसरात जोराचे वादळ आल्याने अनेकांच्या घरावरील छत उडून गेले. रबी पिकांचे ढिग व तणसीचे ढिगही उडून गेले. त्यामळे ढिगात पावसाचे पाणी शिरले. गडचिरोली शहरात जवळपास ५.३० वाजताच्या सुमारास पाऊस झाला. वेळेवर आलेल्या पावसामुळे शहरातील दुकानदार, पादचारी, वाहनधारक यांची तारंबळ उडाली. आणखी ९ तारखेपर्यंत पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्यामुळे पावसाचा धोका कायम आहे. (नगर प्रतिनिधी)