अनुदानाअभावी घरकुलाचे काम पडले बंद
By Admin | Updated: May 20, 2015 02:05 IST2015-05-20T02:05:16+5:302015-05-20T02:05:16+5:30
अहेरी पंचायत समितींतर्गत रमाई घरकूल योजना (ग्रामीण) च्या दोन लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या दरवाजास्तरापर्यंत काम झाले आहे.

अनुदानाअभावी घरकुलाचे काम पडले बंद
जिमलगट्टा : अहेरी पंचायत समितींतर्गत रमाई घरकूल योजना (ग्रामीण) च्या दोन लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या दरवाजास्तरापर्यंत काम झाले आहे. एका लाभार्थ्याच्या घराचे काम १०० टक्के पूर्ण झाले आहे. मात्र या तिन्ही लाभार्थ्यांना गेल्या आठ महिन्यांपासून दुसऱ्या हप्त्याचे घरकुलाचे अनुदान मिळाले नाही. तसेच घरकुलाच्या प्रस्तावासह पंचायत समिती कार्यालयात सादर करण्यात आलेले कागदपत्रे व फोटो गहाळ झाल्याचे अधिकारी सांगत आहेत. त्यामुळे या लाभार्थ्यांवर मोठे संकट कोसळले आहे. अनुदानाअभावी घरकुलाचे बांधकाम रखडले आहे.
अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील कुटुंबांचा निवाऱ्याचा प्रश्न सुटावा तसचे त्यांचे जीवनमान उंचावे याकरिता शासनाने ग्रामीण भागात रमाई घरकूल योजना कार्यान्वित केली. या योजनेची अंमलबजावणी जिल्हा विकास ग्रामीण यंत्रणेमार्फत पंचायत समिती कार्यालयाच्या वतीने करण्यात येते. रमाई घरकूल योजनेंतर्गत अहेरी पंचायत समितीच्या हद्दीतील गावात २०१३-१४ या वर्षात २३ घरकूल मंजूर करण्यात आले. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे अनेक लाभार्थ्यांचे घरकूल रखडले असल्याची माहिती आहे.
अहेरी पंचायत समिती अंतर्गत देचलीपेठा येथील श्रीनिवास समय्या कुमरी व स्वामी रामय्या कारेंगला या दोन लाभार्थ्याच्या घरकुलाचे बांधकाम दरवाजास्तरापर्यंत झाले आहे. त्यामुळे या दोन्ही लाभार्थ्यांना दुसऱ्या हप्त्याच्या अनुदानाची रक्कम मिळणे आवश्यक होती. तसेच देचलीपेठा येथील सडवली चंद्रय्या पन्यालवार या लाभार्थ्याच्या घरकुलाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र पंचायत समितीच्या भोंगळ कारभारामुळे सदर तिन्ही लाभार्थी घरकुलाच्या अनुदानापासून वंचित आहेत. आठ महिन्यांपासून घरकुलाच्या अनुदानाची रक्कम न मिळाल्यामुळे हे तिन्ही लाभार्थी घरकूल बांधकामुळे कर्जबाजारी झाले असल्याची माहिती आहे.
अनुदान देण्यात यावे, या मागणीकरिता तिन्ही लाभार्थ्यांनी अनेकदा पंचायत समिती कार्यालयात उंबरठे झिजविले. मात्र त्यांना न्याय मिळाला नाही. (वार्ताहर)
पुन्हा कागदपत्रे जुळविण्याची लाभार्थ्यावर पाळी
देचलीपेठा येथील श्रीनिवास कुमरी, स्वामी कारेंगला व सडवली पन्यालवार या तिन्ही लाभार्थ्यांनी घरकुलाच्या अनुदानासाठी पंचायत समिती कार्यालयात जाऊन वारंवार अधिकारी व कर्मचाऱ्यांना विचारणा केली. मात्र रमाई घरकूल योजनेच्या फाईलमधून प्रस्तावाला जोडलेले कागदपत्रे व फोटो गहाळ झाल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यामुळे आता अनुदानाच्या रक्कमेची उचल करण्यासाठी या तिन्ही लाभार्थ्यांना पुन्हा कागदपत्रांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.