नवरगाव येथे तीव्र पाणीटंचाई
By Admin | Updated: March 16, 2015 01:20 IST2015-03-16T01:20:16+5:302015-03-16T01:20:16+5:30
तालुक्यातील नवरगाव येथील संपूर्ण जलस्त्रोत आटल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.

नवरगाव येथे तीव्र पाणीटंचाई
कुरखेडा : तालुक्यातील नवरगाव येथील संपूर्ण जलस्त्रोत आटल्याने गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथील तीन हातपंपही नादुरूस्त असल्याने पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागत आहे. गावात पाण्याचे दुर्भिक्ष असतांनाही प्रशासन मात्र निद्रावस्थेत आहे. त्यामुळे पाणीटंचाईची समस्या त्वरित न सोडविल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे.
आंधळी गटग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या नवगावात जवळपास ५०० लोकसंख्या आहे. पिण्याच्या पाण्याची गरज भागविण्याकरिता येथे चार सार्वजनिक विहिरी व पाच हातपंप आहेत. मात्र मागील दोन महिन्यांपासून तीन हातपंप नादुरूस्त अवस्थेत आहेत. शिवाय येथील चार विहिरी कोरड्या पडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पिण्याचे पाणी मिळविण्याकरिता कसरत करावी लागत आहे. गावाबाहेर तसेच आंधळी मार्गावरील जि. प. शाळेत हातपंप आहे. परंतु येथे पहाटेपासूनच पिण्याच्या पाण्याकरिता झुंबळ उडत असते. दोन्ही बोरवेल गावाबाहेर असल्याने पिण्याच्या पाण्याकरिता नागरिक जातात. परिणामी त्यांना सकाळपासूनच पाण्यासाठी रांगेत उभे राहावे लागते. यात अनेकांचा वेळही वाया जातो. त्यामुळे गावातील महिलांमध्ये ग्रा. पं. प्रशासनाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे. पाणी टंचाई निवारणासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आल्या नाही, असा आरोप ग्रामस्थ दुधराम कवाडकर, तानू उईके, तानाजी जांभुळकर, तुळशिराम मानकर, गुणाजी जांभुळकर, योगेश ठलाल व अन्य ग्रामस्थांनी केला आहे. गावातील पाणीटंचाईची समस्या त्वरित न सोडविल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे. या संदर्भात पं. स. सदस्य चांगदेव फाये यांची विचारणा केली असता, नवरगावची समस्या लक्षात घेता येथे पाईपलाईनचा विस्तार करण्यात आला आहे. मात्र तांत्रिक अडचणींमुळे योजना कार्यान्वित झाली नाही, पाणीटंचाईचा प्रश्न सोडवू, असे सांगितले. (तालुका प्रतिनिधी)