धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची पंचाईत
By Admin | Updated: November 11, 2015 00:51 IST2015-11-11T00:51:27+5:302015-11-11T00:51:27+5:30
आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत केंद्रांवर धान खरेदी केली जाते.

धान खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची पंचाईत
केंद्र सुरू करा : व्यापाऱ्यांच्या घशात धान जाण्याची शक्यता
वैरागड : आदिवासी विकास महामंडळांतर्गत आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थांमार्फत आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत केंद्रांवर धान खरेदी केली जाते. मात्र दिवाळीचा सण येऊनही आरमोरी तालुक्यातील वैरागड भागातील एकही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांचे धान कवडीमोल भावात खासगी व्यापाऱ्यांच्या घशात जाण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांची प्रचंड पंचाईत झाली आहे.
यंदाच्या खरीप हंगामात पावसाच्या लहरीपणामुळे धान पिकाचा उतारा कमी आहे. जे काही तुटपूंजे उत्पादन शेतकऱ्यांच्या हाती आले आहे. ते कवडीमोल भावाने खासगी व्यापाऱ्यांना विकावे लागत आहे. खासगी व्यापारी प्लास्टिकच्या बारदान्याचा अडीच किलो वजन अधिक घेतात आणि हमालीचे पैसे देखील शेतकऱ्यांकडून वसूल केले जात आहेत. आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत सहकारी संस्थांनी धान खरेदी केंद्र सुरू न केल्यामुळे शेतकऱ्यांची खासगी व्यापाऱ्यांकडून सर्रास लूट केली जात आहे. वैरागड हे गाव गैरआदिवासी उपयोजन क्षेत्रात येत असल्याने येथील सेवा सहकारी संस्थेने जिल्हा फेडरेशनच्या मार्फतीने धान खरेदी केंद्र सुरू करावे. आरमोरी तालुक्यातील देलनवाडी, कुरंडी (माल), दवंडी, विहीरगाव, मौशिखांब, वडसा तालुक्यातील पिंपळगाव येथे धान खरेदी केंद्र तत्काळ सुरू करावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वैरागड गट ग्राम पंचायतीत समाविष्ट असलेले पाटणवाडा गावाचा समावेश पेसा अंतर्गत होते. कुरंडी (माल) या सहकारी संस्थेला पाटणवाडा गावाला जोडून आदिवासी विकास महामंडळाने पाटणवाड येथे धान खरेदी केंद्र सुरू करावे, अशी सूचना वैरागड संस्थेच्या काही सदस्यांंनी आमसभेत केली होती. मात्र याकडे संस्थेचे सचिव दुर्लक्ष करीत आहेत, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे.
देलनवाडी संस्थेमार्फत अद्यापही धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या पर्वावर या भागातील शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना धान विकावे लागत आहे.