निष्काळजीमुळे सुकाळातील इंदिरा आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू
By Admin | Updated: October 6, 2015 01:55 IST2015-10-06T01:55:20+5:302015-10-06T01:55:20+5:30
येथून पाच किमी अंतरावर असलेल्या सुकाळा येथील इंदिरा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षण घेत

निष्काळजीमुळे सुकाळातील इंदिरा आश्रमशाळेतील विद्यार्थ्याचा मृत्यू
वैरागड : येथून पाच किमी अंतरावर असलेल्या सुकाळा येथील इंदिरा प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या आठव्या वर्गातील सुभाष अनंतराव इष्टाम रा. करैन ता. एटापल्ली या विद्यार्थ्याचा शनिवारी मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूसाठी आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचा आरोप सुभाषच्या कुटुंबीयांनी तसेच गावकऱ्यांनी केला आहे. याबाबत आरमोरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रारसुद्धा दाखल करण्यात आली आहे.
मृतक सुभाष हा २८ सप्टेंबरपासून आजारी होता. सुभाष आजारी असल्याची माहिती त्याच्या गावचा विद्यार्थी सोमजी कोरामी याने शिक्षकांना दिली होती. मात्र याकडे शिक्षक, अधीक्षक, मुख्याध्यापकांनी जाणूनबुजून दुर्लक्ष केले. दोन दिवसात त्याची प्रकृती अधिकच खालावली. तेव्हा दोन शिक्षक व एका चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्याने सुभाषला आरमोरी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती अधिकच गंभीर असल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले. जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. चार-पाच दिवसांपासून सुभाष तापाने फणफणत असतानाही त्याच्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी सुभाषला जीव गमवावा लागला. यासाठी जबाबदार असलेल्या मुख्याध्यापक, शिक्षक व अधीक्षकांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. आश्रमश
आश्रमशाळेच्या या गलथान कारभाराबाबत पालकवर्गांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या आश्रमशाळेतील सोयीसुविधांची चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. याबाबत मुख्याध्यापकांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क झाला नाही. (वार्ताहर)
वर्षातून काही दिवसच येतात अधीक्षक
४शाळेचे अधीक्षक म्हणून बी. आर. भरे कार्यरत आहेत. ते संस्थेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्यसुद्धा आहेत. याचा गैरफायदा उचलणे त्यांनी सुरू केले आहे. वर्षातून अगदी बोटावर मोजण्याइतके दिवस ते शाळेत येतात. शाळेत आले तरी रात्रभर कधीच थांबत नाही. केवळ शासनाचे वेतन हडपण्यासाठी अधीक्षक पदावर कार्यरत आहेत. अधीक्षक पदाची जबाबदारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी सांभाळत असल्याचे दिसून येते.
अधीक्षिका राहते भाड्याच्या खोलीत
४या आश्रमशाळेत एकूण २४२ विद्यार्थी निवासी राहतात. त्यापैकी विद्यार्थिनींची संख्या १०८ एवढी आहे. विद्यार्थिनींवर देखरेख ठेवण्यासाठी अधीक्षिका नेमण्यात आल्या आहेत. मात्र त्या रात्रीच्या सुमारास शाळेत थांबत नाही. शाळेपासून दूर अंतरावर डोमाजी सहारे यांच्या घरी त्या भाड्याने राहतात. रात्रीच्या वेळी एकही स्त्री कर्मचारी या ठिकाणी राहत नसल्याने विद्यार्थिनींची सुरक्षा वाऱ्यावरच असल्याचे दिसून येते.
येथील कार्यरत कर्मचारी विद्यार्थ्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, अशी तक्रार मी स्वत: संस्थाचालकांकडे केली होती. पण काहीही उपयोग झाला नाही. आमचे कर्मचारी नियमित तपासणीला येतात. पण येथील कर्मचाऱ्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नाही. या आश्रमशाळेत पोळ्यानंतर नऊ विद्यार्थी मलेरियाने बाधित असल्याचे आढळून आले आहेत.
- डॉ. संजय सुपारे, वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, देलनवाडी
सुभाषची प्रकृती फारशी गंभीर नव्हती. आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांनी त्याच्या प्रकृतीकडे दुर्लक्ष केले नाही. त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. रुग्णालय दाखल करेपर्यंत व्यवस्थित चालत होता. मात्र अचानक प्रकृती बिघडली.
- आर. जी. वलादे, सहायक शिक्षक, इंदिरा आश्रमशाळा, सुकाळा