पुरामुळे वैरागड-मानापूर मार्ग बंद
By Admin | Updated: August 30, 2015 01:01 IST2015-08-30T01:01:51+5:302015-08-30T01:01:51+5:30
गेल्या चार-पाच दिवसांपासून वैरागड परिसरात पाऊस बरसत आहे.

पुरामुळे वैरागड-मानापूर मार्ग बंद
यंदा प्रथमच वाहतूक ठप्प : जीव धोक्यात घालून नागरिक करीत आहेत प्रवास
वैरागड : गेल्या चार-पाच दिवसांपासून वैरागड परिसरात पाऊस बरसत आहे. शुक्रवारी रात्री झालेल्या संततधार पावसामुळे वैरागड-मानापूर मार्गावरील वैलाचना नदीच्या पुलावर पाणी वाढले. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच सदर मार्ग बंद असून वाहतूक ठप्प आहे. दरम्यान काही नागरिक जीव धोक्यात घालून पाण्यातूनच प्रवास करीत आहेत.
वैरागडजवळील वैलोचना नदी पात्रातील पुलाची उंची अतिशय कमी आहे. यामुळे जोरदार पाऊस झाल्यास वैरागड-मानापूर मार्गावरील वाहतूक ठप्प होतो. ही समस्या लक्षात घेऊन या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी या भागातील नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे लावून धरली. मात्र या पुलाची उंची वाढविण्यास प्रशासनाने पावले उचलली नाही. आघाडी सरकारच्या काळात या पुलाची उंची वाढवून नवीन बांधकाम करण्यासाठी महिनाभर सर्वेक्षण करण्यात आले होते. मात्र त्यानंतर पुढची कार्यवाही झाली नाही. आरमोरीचे आमदार क्रिष्णा गजबे यांनी या मार्गावरील पुलाचे काम मंजूर झाले असल्याची माहिती नागरिकांना दिली होती. गतवर्षी अतिवृष्टीमुळे नऊ वेळा या मार्गावरील वाहतूक बंद होती.
मजूर परतल्याने रोवणीचे काम खोळंबले
वैरागड गावात राहणाऱ्या अनेक शेतकऱ्यांची मानापूर भागात शेती आहे. तर पुलापलिकडील काही शेतकऱ्यांची पुलाच्या अलिकडील भागात शेती आहे. नेहमीप्रमाणे अनेक शेतमालक मजूर घेऊन रोवणीसाठी निघाले मात्र वैलोचना नदीच्या पुलावर पूर असल्याने दोन्हीकडील शेतमालक मजुरांसह घरी परतले. परिणामी रोवणीचे काम खोळंबले.