संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत
By Admin | Updated: June 22, 2015 01:28 IST2015-06-22T01:28:58+5:302015-06-22T01:28:58+5:30
शनिवारी दुपारी ३ वाजतापासून रविवारी सायंकाळपर्यंत मेघगर्जनेसह जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात दमदार पाऊस बरसला.

संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत
दीडशे गावांचा संपर्क तुटला : अहेरी-गडअहेरी, आलापल्ली-सिरोंचा मार्ग बंद, जिमलगट्टा-गोविंदगाव मार्गावरील पूल खचला
गडचिरोली : शनिवारी दुपारी ३ वाजतापासून रविवारी सायंकाळपर्यंत मेघगर्जनेसह जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात दमदार पाऊस बरसला. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस असल्यामुळे अहेरी, सिरोंचा, एटापल्ली व भामरागड तालुक्यातील जवळपास दीडशे गावांचा संपर्क पुरामुळे तुटला आहे. पुरामुळे अहेरी-गडअहेरी, आलापल्ली-सिरोंचा तसेच आलापल्ली-भामरागड मार्ग बंद झाले आहे. अहेरी तालुक्यातील जिमलगट्टापासून गोविंदगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल अतिवृष्टीमुळे खचल्याने या मार्गावरीलही वाहतूक बंद आहे.
जिल्ह्यात शनिवारी दुपारी ३ वाजतापासून रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ८५.२० सरासरीने एकूण १०२२.४ मिमी पाऊस झाला. जिल्हा प्रशासनाने गडचिरोली तालुक्यात ८६.२, धानोरा २९.२, चामोर्शी १२२.०, मुलचेरा १३०.८, देसाईगंज ३६.०, आरमोरी २२.०, कुरखेडा २७.८, कोरची ४७.२, अहेरी १६१.२, एटापल्ली १८८.२ व सिरोंचा तालुक्यात १४१.८ मिमी पाऊस झाल्याची नोंद घेतली आहे.
संततधार पावसामुळे नद्या, नाले तुडूंब भरुन वाहत असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. अहेरीनजीकच्या गडअहेरी पुलावरुन पाणी ओसंडून वाहत असल्याने हा मार्ग बंद झाला आहे. परिणामी इंदाराम, व्यंकटरावपेठा, आवलमरी, चेरपल्ली, बामणी, कोत्तागुड्डम आदींसह परिसरातील ४० गावांचा संपर्क तुटला आहे. आलापल्ली-सिरोंचा मार्गावरील रेपनपल्ली नाल्याला पूर आल्याने हा मार्गही बंद आहे. शिवाय आलापल्ली-भामरागड मार्गावरील छोट्या नाल्यांवरुन पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. आलापल्लीजवळील पुसुकपल्ली नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने सदर मार्ग बंद झाला आहे. भामरागड-लाहेरी मार्गही बंद आहे. या भागातील वीजपुरवठा व मोबाईलसेवा पूर्णपणे ठप्प झाली आहे. रविवारी पहाटेच्या सुमारास अतिवृष्टीमुळे अहेरी येथील वॉर्ड क्रमांक ४ मधील नामदेव कुळसंगे यांचे घर कोसळले. यावेळी ग्रा.पं. सदस्य शैलेश पटवर्धन यांनी कुळमेथे यांना मदत करुन त्यांना सुरक्षितस्थळी हलविले. अहेरी नगर पंचायतीचे प्रशासक सुरेश पुप्पलवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. जिमलगट्टा परिसरातील वीज पुरवठा व मोबाईलसेवाही पूर्णपणे बंद आहे.
जिमलगट्टा ते गोविंदगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल अतिवृष्टीमुळे खचला त्यामुळे या मार्गावरील वाहतूक शनिवारपासून बंद आहे. पूर परिस्थितीमुळे जिमलगट्टा भागातील देचलीपेठा, किष्टापूर, दोडगेर आदीसह २० गावांचा संपर्क तुटला आहे. धानोरा तालुक्यात अतिवृष्टीमुळे अनेक मार्गांवर झाडे आडवी पडली असून, वाहतुकीवर विपरित परिणाम झाला आहे. आज सकाळपासून पावसाची संततधार सुरु असल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे.
भामरागड तालुक्यातील पर्लकोटा, अहेरी तालुक्यातील प्राणहिता व सिरोंचानजीकची पामुलगौतम नदी संततधार पावसामुळे दुथळी भरून वाहत आहे. भामरागड तालुक्यातील दूरध्वनी व भ्रमणध्वनी सेवा ठप्प झाली आहे.एटापल्ली तालुक्यात गेदा परिसरात अनेक मार्गावर झाडे कोसळली.
संततधार पावसामुळे गेल्या तीन-चार दिवसांपासून जिल्ह्यातील पेरणीची कामे खोळंबली आहेत. पावसामुळे गडचिरोली शहरातील कन्नमवारनगर, अयोध्या नगर, लांजेडा, बसस्थानक, तहसील कार्यालय, गांधी वार्ड , तसेच कॉम्प्लेक्स परिसरातील काही सखल भागात पाणी साचले आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)