मद्यधुंद जि.प. सदस्याच्या कारची तिघांना धडक

By Admin | Updated: June 1, 2015 02:00 IST2015-06-01T01:59:14+5:302015-06-01T02:00:33+5:30

येथील जिल्हा परिषदेचे सदस्य पद्माकर मानकर यांनी मद्यधुंद अवस्थेत कार चालवीत रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तिघांना धडक देऊन...

Drunken zip A member of the car hit the three | मद्यधुंद जि.प. सदस्याच्या कारची तिघांना धडक

मद्यधुंद जि.प. सदस्याच्या कारची तिघांना धडक

दोन जखमी, एक गंभीर : पद्माकर मानकर यांच्यावर गुन्हा दाखल
गडचिरोली : येथील जिल्हा परिषदेचे सदस्य पद्माकर मानकर यांनी मद्यधुंद अवस्थेत कार चालवीत रस्त्याच्या कडेला उभे असलेल्या तिघांना धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना शनिवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास कॉम्प्लेक्स परिसरात घडली. याप्रकरणी गडचिरोली पोलिसांनी पद्माकर मानकर यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत.
पद्माकर मानकर हे शनिवारी रात्री जिल्हा परिषदेतून आपल्या एमएच ३३-४९१ या इंडिका कारने बाहेर पडले. मात्र, रस्त्याने येत असताना त्यांनी दोन-तीन जणांना धडक दिली. हरिओम मोबाईल शॉपीजवळ उभे असलेले अजिंक्य उमेश पोरेड्डीवार, शुभम शंकर रणदिवे व सूरज भाऊराव तुपट यांना मानकर यांच्या कारची धडक बसली. यात अजिंक्य पोरेड्डीवार याच्या डोळयाला जबर मार लागला, तर शुभम रणदिवेचा हात तुटला. सूरज तुपट हाही जखमी झाला. तिन्ही जखमींना येथील जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र अजिंक्य पोरेड्डीवार याची प्रकृती गंभीर असल्याने शनिवारी रात्री उशीरापर्यंत त्यांना नागपूरच्या रूग्णालयात हलविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनेनंतर कॉम्प्लेक्स बसस्थानक परिसरात नागरिकांचा जमाव निर्माण झाला. संतप्त झालेल्या नागरिकांकडून मानकर यांना धोका निर्माण होऊ शकतो, हे ओळखून पोलिसांनी पद्माकर मानकर यांना पोलिस ठाण्यात आणले व त्यांच्यावर भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८ व मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ व १८५ अन्वये गुन्हे दाखल केले. दरम्यान पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पद्माकर मानकर यांनी प्रकृती बिघडल्याचे सांगितल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आले, अशी माहिती पोलिसांनी दिली. पद्माकर मानकर मद्यधुंद अवस्थेत गाडी चालवीत होते, असेही पोलिसांनी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
पद्माकर मानकर यांच्या कारच्या धडकेत तिघे जण जखमी झाले. या घटनेची पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून मानकर यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. मानकर यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मानकर हे दारू पिऊन कार चालवित होते, अशी फिर्यादी सूरज तुपट यांच्याकडून माहिती मिळाली. त्यामुळे मानकर यांच्या रक्ताची चाचणी करण्यासाठी त्यांच्या रक्ताचे नमुने नागपूरला पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर मानकर हे दारू पिऊन कार चालवित होते किंवा नाही हे स्पष्ट होईल.
- सोमेश्वर रोहणकर, सहायक पोलीस उपनिरीक्षक,
पोलीस ठाणे गडचिरोली

Web Title: Drunken zip A member of the car hit the three

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.