जिल्हा रुग्णालयात औषधाची टंचाई
By Admin | Updated: September 21, 2015 01:29 IST2015-09-21T01:29:29+5:302015-09-21T01:29:29+5:30
जिल्हा रुग्णालयाच्या भांडारात मागील काही दिवसांपासून खोकल्याच्या औषधाचा टंचाई असल्यामुळे अनेक रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधी बाहेरून खरेदी करावी लागत आहे.

जिल्हा रुग्णालयात औषधाची टंचाई
खोकल्याच्या औषधाचा तुटवडा : खासगी दुकानातून खरेदी वाढली
गडचिरोली : जिल्हा रुग्णालयाच्या भांडारात मागील काही दिवसांपासून खोकल्याच्या औषधाचा टंचाई असल्यामुळे अनेक रुग्णांना डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधी बाहेरून खरेदी करावी लागत आहे. त्यामुळे रुग्णांना नाहक भूर्दंड बसत आहे. अनेक गरीब रुग्ण याबाबत रुग्णालय प्रशासनाविरोधात आरडाओरड करीत असून सदर औषधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
वातावरणात प्रचंड मोठ्या प्रमाणावर बदल झाला आहे. कधी पाऊस तर कधी प्रचंड उकाडा निर्माण होत आहे. यामुळे आजार मोठ्या संख्येने वाढले आहेत. सध्या जिल्ह्यात विविध भागात व्हायरल फिवरची साथ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे रुग्णांचा ओढा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. खोकला, दमा, ताप, सर्दी अशा आजारांचे रुग्ण येथे दररोज बाह्यरुग्ण विभागात येतात. मागील काही दिवसांपासून जिल्हा सामान्य रूग्णालयात खोकल्याच्या औषधाचा तुटवडा निमार्ण झाला आहे. खोकल्याने ग्रस्त एखादा रूग्ण रूग्णालयात गेला व त्याने खोकल्याची औषध मागीतली तर डॉक्टर सदर औषध लिहून देत नाही. अशी तक्रार रूग्णांकडून केली जात आहे. त्यामुळे नाईलाजास्तव रूग्णांना सदर औषध खासगी दुकानातून खरेदी करावे लागत आहे.
याबाबत जिल्हा सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांना विचारणा केली असता खोकल्याच्या औषधाचा शासनाकडून पुरवठा केला जातो. आपल्या औषध भांडारात खोकल्याच्या औषधीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. डॉक्टर खोकल्याचे औषध पुरक औषध म्हणून लिहून देतात. अशी माहिती लोकमतशी बोलताना दिली.