आमदारांनी घेतला दुष्काळाचा आढावा
By Admin | Updated: August 26, 2015 01:12 IST2015-08-26T01:12:49+5:302015-08-26T01:12:49+5:30
आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी स्थानिक राजीव भवनात मंगळवारी कृषी विषयक आढावा बैठक घेतली.

आमदारांनी घेतला दुष्काळाचा आढावा
कुरखेडात बैठक : अधिकाऱ्यांना दिले निर्देश; गावनिहाय जाणली परिस्थिती
कुरखेडा : आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आ. क्रिष्णा गजबे यांनी स्थानिक राजीव भवनात मंगळवारी कृषी विषयक आढावा बैठक घेतली. या बैठकीत प्रत्येक अधिकाऱ्यांकडून गावनिहाय दुष्काळाची परिस्थिती जाणून घेऊन उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
आढावा बैठकीला नायब तहसीलदार पोरेड्डीवार, संवर्ग विकास अधिकारी तुरकर, भाजपाचे तालुकाध्यक्ष राम लांजेवार, जिल्हा उपाध्यक्ष विलास गावंडे, गणपत सोनकुसरे, पं. स. सदस्य चांगदेव फाये, शहर अध्यक्ष रवींद्र गोटेफोडे यांच्यासह तलाठी, ग्रामसेवक, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, बँकांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
आ. क्रिष्णा गजबे यांनी चार दिवसांपूर्वी कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, कोरची या तालुक्यांचा दौरा करून दुष्काळाची पाहणी केली होती. यादरम्यान या चारही तालुक्यांमध्ये भयावह परिस्थिती असल्याचे दृष्टीस आले. अनेक शेतकऱ्यांचे रोवणी झाली नाही. ज्या शेतकऱ्यांची रोवणी झाली आहे. त्या शेतकऱ्यांचे धान पीक करपण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असल्याचे लक्षात आले. त्यानंतर आमदारांनी प्रत्येक तालुक्यात आढावा बैठक घेऊन परिस्थिती जाणून घेण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार मंगळवारी कुरखेडा तालुक्याची आढावा बैठक घेतली. कमी दाबाच्या व खंडित वीज पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांना होणारा त्रास दूर करण्याचे निर्देश आमदारांनी दिले. कर्जासाठी येणाऱ्या शेतकऱ्याला अपमानास्पद वागणूक देणाऱ्यावर कडक कारवाई करण्याचा इशाराही दिला. दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी विविध उपाय योजण्याचेही निर्देश दिले. (तालुका प्रतिनिधी)