अवकाळी पावसाने मका पीक उद्ध्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 23:33 IST2018-02-12T23:32:59+5:302018-02-12T23:33:19+5:30
रविवारी सायंकाळी वादळ वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका रबी पिकांसह मका पिकाला बसला आहे.

अवकाळी पावसाने मका पीक उद्ध्वस्त
आॅनलाईन लोकमत
कुरखेडा : रविवारी सायंकाळी वादळ वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाचा फटका रबी पिकांसह मका पिकाला बसला आहे. मका पीक खाली पडल्याने या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
कुरखेडा परिसरात रबी हंगामात यापूर्वी मिरची पिकाची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत होती. मात्र मिरची पिकातून फारसा नफा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षांपासून मका पिकाची लागवड करण्यास सुरूवात केली आहे. पलसगड, पुराडा, मालेवाडा, कढोली परिसरात जवळपास एक हजार हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड झाली आहे. मका पिकाला फूल येण्यास सुरूवात झाली आहे. अशातच रविवारी सायंकाळी या परिसरात वादळवाºयासह अवकाळी पावसाने झोडपून काढले. वादळामुळे उभे असलेले मका पीक खाली कोसळले. तर काही मक्याची रोपटे मोडली आहेत. त्यामुळे मक्याच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता आहे.
मका पिकासह हरभरा, उडीद, मूग, लाखोळी, तूर पिकाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी यांनी सोमवारी गरगडा, खेडेगाव, पलसगड, चलनटोला, चारभट्टी, पिटेसूर, कोटलाडोह, अंतरगाव आदी गावांना भेटी देऊन रबी पिकांची पाहणी केली. या पाहणीदरम्यान रबी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे दिसून आले. महसूल विभागाने नुकसानीचा पंचनामा करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी, जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालावे, अशी मागणी प्रभाकर तुलावी व शेतकऱ्यांनी केली आहे.