घरकुलाचे स्वप्न भंगले
By Admin | Updated: December 24, 2014 23:00 IST2014-12-24T23:00:01+5:302014-12-24T23:00:01+5:30
इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ४ हजार ९२५ घरकुलांचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडले आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीचे घरकुलाचे स्वप्न भंगले आहे.

घरकुलाचे स्वप्न भंगले
गडचिरोली : इंदिरा आवास योजनेंतर्गत बांधण्यात येणाऱ्या ४ हजार ९२५ घरकुलांचे बांधकाम मागील दोन वर्षांपासून विविध कारणांमुळे रखडले आहे. त्यामुळे सर्वसामान्य व्यक्तीचे घरकुलाचे स्वप्न भंगले आहे.
सर्वसामान्य व्यक्तीचे घरकुलाचे स्वप्न पूर्ण व्हावे, यासाठी केंद्र शासनाने इंदिरा आवास योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत सर्वच प्रवर्गातील बीपीएल यादीत नाव समाविष्ट असलेल्या नागरिकांना या योजनेचा लाभ दिला जातो. सदर योजनेंतर्गत घरकूल बांधकामासाठी लाभार्थ्याला १ लाख रूपयांचे अनुदान दिले जाते.
२०१२-१३ या वर्षात गडचिरोली जिल्ह्याला ३ हजार ६८६ घरकुलांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. यापैकी २ हजार ७७६ घरकुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहेत. तर १ हजार ९१० घरकूल अजूनही अपूर्ण स्थितीत आहेत. २०१३-१४ या वर्षात ४ हजार ९७६ घरकूल बांधकामाचे उद्दिष्ट असताना केवळ १ हजार ९६१ घरकूल बांधण्यात आले असून ३ हजार १५ घरकुलांचे बांधकाम अजूनही अपूर्ण असल्याची गंभीर बाब उजेडात आली आहे. दोन वर्षाचे मिळून सुमारे ४ हजार ९२५ घरकूल अजूनही बांधण्यात आली नाहीत. २०१४-१५ या आर्थिक वर्षात ७ हजार ७९४ घरकुलांच्या बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ६ हजार ८१५ लाभार्थ्यांना प्रशासनाच्यावतीने पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे. तर उर्वरित ९७९ लाभार्थ्यांना अजूनपर्यंत पहिला हप्ताही मिळाला नाही.
चार वर्षापूर्वी प्रशासनाने घरकूल लाभार्थ्यांची प्रतीक्षा यादी तयार केली आहे. या यादीतील लाभार्थ्यांनाच घरकूल उपलब्ध करून देण्यात येते. बऱ्याचवेळा घरकूल मंजूर होऊन चार ते पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही प्रशासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात नाही. यावर्षीचीच बाब विचारात घेतली तर घरकूल लाभार्थ्यांना नुकताच पहिला हप्ता वितरीत करण्यात आला आहे. मात्र सध्या विटा तयार करणे सुरू झाले नाही. रेती घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेतीही मिळणे अशक्य होते. त्यामुळे घर बांधावे कसे, असा प्रश्न बहुतांश लाभार्थ्यांसमोर निर्माण होते. याही अडचणींचा सामना करत काही लाभार्थी एका विशिष्ट मर्यादेपर्यंत घर बांधतात. मात्र बांधलेल्या घराचे निरीक्षण करून दुसरा हप्ता वेळेवर दिला जात नाही. त्यामुळे बांधकाम बऱ्याचवेळा अपूर्ण स्थितीत राहते. मार्चनंतर निधी उपलब्ध करून देण्यासाठी बऱ्याच वेळा प्रशासनाकडून टाळाटाळ केली जाते. प्रशासनाच्या या अडेलतट्टू धोरणामुळे वर्ष लोटूनही घरकुलाचे बांधकाम पूर्ण होत नाही. बहुसंख्य घरकूल लाभार्थी जुने घर पाडून त्याच जागेवर घरकुलाचे बांधकाम सुरू केले आहे. मात्र बांधकाम अपूर्ण असल्याने लाभार्थ्याला झोपडीमध्ये राहावे लागत आहे. घरकूल मिळूनही सदर लाभार्थी बेघर झाला असल्याचे दिसून येते. घरकूल लाभार्थ्यांमध्ये प्रशासनाप्रती तीव्र निर्माण झाला असून निधी उपलब्ध करून देण्याची मागणी आहे (नगर प्रतिनिधी)