वसतिगृहातील भोजनाची तपासणी होणार
By Admin | Updated: November 25, 2014 22:54 IST2014-11-25T22:54:21+5:302014-11-25T22:54:21+5:30
आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयामार्फत चालविल्या जाणाऱ्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याची ओरड नेहमी विद्यार्थी

वसतिगृहातील भोजनाची तपासणी होणार
दर्जा सुधारणार : प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढली नवी क्लृप्ती
दिलीप दहेलकर - गडचिरोली
आदिवासी विकास विभागाच्या प्रकल्प कार्यालयामार्फत चालविल्या जाणाऱ्या शासकीय आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ट दर्जाचे भोजन दिले जात असल्याची ओरड नेहमी विद्यार्थी व पालकांकडून होत असते. निकृष्ट भोजन मिळत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या तक्रारी गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांना प्राप्त झाल्या. या संदर्भात त्यांनी नवा निर्णय घेऊन वसतिगृहातील भोजनाची तपासणी करण्याबाबत जिल्हा आरोग्य विभाग व अन्न व औषध प्रशासनाला पत्र दिले आहेत. नव्या निर्णयानुसार आता गडचिरोली प्रकल्पातील २१ शासकीय आदिवासी मुलामुलींच्या वसतिगृहातील भोजनाची महिन्यातून दोनदा तपासणी करण्यात येणार आहे.
आदिवासी विकास विभागाच्या एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय गडचिरोली अंतर्गत २१ शासकीय आदिवासी मुलामुलींचे वसतिगृह सुरू आहेत. या वसतिगृहांमध्ये विद्यार्थ्यांना कंत्राटदारांमार्फत भोजन पुरवठा केला जातो. प्रकल्प कार्यालयाच्यावतीने ई-निविदा प्रक्रिया राबवून भोजन पुरवठ्याचे कंत्राट खासगी कंत्राटदाराला देण्यात आले. मात्र संबंधीत कंत्राटदार काही दिवस वसतिगृहातील विद्यार्थ्यांना निकृष्ठ भोजनाचा पुरवठा करतात. तर काही दिवस दर्जेदार भोजन देतात. कंत्राटदारांकडून निकृष्ट भोजन मिळत असल्याच्या विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी गडचिरोलीचे प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांना प्राप्त झाल्या. या तक्रारीची दखल घेऊन प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी प्रकल्पातील सर्व शासकीय मुलामुलींच्या वसतिगृहातील भोजनाची वसतिगृहाच्या परिसरात असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात तसेच ग्रामीण रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी नियमित तपासणी करावी, असा निर्णय घेतला. याबाबत प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी प्रकल्प कार्यालयामार्फत जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात पत्र पाठविले आहे.
पोषक अन्नाचा निकटचा संबंध विद्यार्थ्यांचे आरोग्य व बौध्दिक क्षमतेशी आहे. त्यामुळे शासकीय आदिवासी मुलांच्या वसतिगृहातील विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना नियमित दर्जेदार व पोषक भोजन मिळावे, याकरीता प्रकल्प अधिकारी पी. शिवशंकर यांनी नवे पाऊल उचलले आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या या नव्या निर्णयामुळे आता प्रकल्पातील २१ वसतिगृहातील भोजनाची नियमित तपासणी होणार आहे. याची अंमलबजावणी डिसेंबर महिन्यांपासून सुरू होणार आहे. वसतिगृहातील भोजनाच्या तपासणीच्या कामात संबंधीत वैद्यकीय अधिकारी व अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी हयगय केल्यास संबंधीत अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, असेही प्रकल्प अधिकाऱ्यांनी आरोग्य, अन्न व औषध प्रशासन विभागाला पाठविलेल्या पत्रात नमूद केले आहे. या निर्णयामुळे कंत्राटदारांचे धाबे दणाणले आहे.