त्रिसदस्यीय समितीसोबतही डॉक्टरांची उद्धट वागणूक
By Admin | Updated: December 31, 2014 23:23 IST2014-12-31T23:23:58+5:302014-12-31T23:23:58+5:30
एटापल्ली तालुक्यातील पंदेवाही येथील विनोबा भावे आश्रमशाळेतील इयत्ता ६ वीची विद्यार्थिनी सुनिता कुल्ले ओक्सा हिच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात त्रिसदस्यीय

त्रिसदस्यीय समितीसोबतही डॉक्टरांची उद्धट वागणूक
अहेरी : एटापल्ली तालुक्यातील पंदेवाही येथील विनोबा भावे आश्रमशाळेतील इयत्ता ६ वीची विद्यार्थिनी सुनिता कुल्ले ओक्सा हिच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात त्रिसदस्यीय समिती दाखल झाल्यावर येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद अकिनवार यांच्याकडून समितीतील सदस्यांना उद्धट वागणुकीचा अनुभव आला, अशी माहिती पुढे आली आहे.
एटापल्ली ग्रामीण रूग्णालय विविध समस्यांचे माहेरघर बनले आहे. या ग्रामीण रूग्णालयात डॉक्टरांची अनेक पदे रिक्त आहेत. सध्या कार्यरत असलेले वैद्यकीय अधीक्षक डॉ. अरविंद अकिनवार हे मुख्यालयी राहत नाही. जर आलेच तर ते उशीरा येतात. त्यांच्या लेटलतीफपणामुळे इतर डॉक्टर व अन्य कर्मचारी मनमौजी झाले आहेत. याचा फटका दुर्गम व अतिदुर्गम भागातून येणाऱ्या रूग्णांना प्रचंड प्रमाणात बसत आहे. रूग्णालयात कर्तव्य कालावधीत दौरे दाखवून स्वत:चे खासगी दवाखाने दुर्गम भागातही या डॉक्टरांनी उघडले असल्याची माहिती मिळाली आहे.
१ डिसेंबर २०१४ रोजी सुनिता कुल्ले ओक्सा या विद्यार्थिनीचा मृत्यू झाला. याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती रूग्णालयात गेल्यावर डॉ. अकिनवार यांच्याकडून योग्य सहकार्य मिळाले नाही. याप्रकरणातील संबंधीत डॉ. खापर्डे यांना विचारणा केली असता, त्यांनी क्रिष्णार येथील अंगणवाडी तपासणीच्या कामात असल्याचे सांगितले. मात्र यावेळी समितीला ग्रामस्थांनी डॉ. खापर्डे हे स्वत:च्या क्लिनिकमध्ये असल्याची माहिती दिली. त्यानंतर समितीच्या एका सदस्याने त्यांचे क्लिनिक गाठले व उपचाराच्या गोळ्यांची चिठ्ठी घेतली. यावेळी एक इसमही तेथे हजर होता. एकूणच एटापल्ली ग्रामीण रूग्णालयात बाहेरगाववरून आलेल्या रूग्णांना सेवा देण्याऐवजी डॉक्टर आपल्या स्वत:चे दवाखाने सांभाळत असल्याचे चित्र दिसून आले.