रूग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरला शिवीगाळ व मारहाण

By Admin | Updated: August 13, 2016 01:44 IST2016-08-13T01:44:18+5:302016-08-13T01:44:18+5:30

गंभीर स्थितीत जिल्हा सामान्य रूग्णालयात आणलेल्या महिला रूग्णावर उपचार करण्यास दिरंगाई होत असल्याच्या...

The doctor was abducted and beaten by a relative | रूग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरला शिवीगाळ व मारहाण

रूग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरला शिवीगाळ व मारहाण

जिल्हा रूग्णालयातील प्रकार : डॉक्टरांच्या कामबंद आंदोलनाने आरोग्य सेवा प्रभावित
गडचिरोली : गंभीर स्थितीत जिल्हा सामान्य रूग्णालयात आणलेल्या महिला रूग्णावर उपचार करण्यास दिरंगाई होत असल्याच्या आरोपावरून संबंधित रूग्णाच्या नातेवाईकांनी कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना चक्क शिविगाळ करून मारहाण केल्याची घटना ११ आॅगस्ट रोजी गुरूवारला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणाची संबंधित डॉक्टर व मॅग्मो संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून जिल्हाभरातील डॉक्टरांनी शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामुळे शुक्रवारी जिल्हाभरातील आरोग्य सेवा डॉक्टरांअभावी प्रचंड प्रभावित झाली.
गडचिरोली शहरालगतच्या मेंढा (बोदली) येथील रहिवासी असलेल्या प्रतीभा भैसारे या महिला रूग्णाला गुरूवारी रात्री ११.२० वाजतानंतर जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या आपत्कालीन विभागात भरती करण्यात आले. यावेळी सदर रूग्णासोबत तिचा मुलगा नितेशकुमार भैसारे हा उपस्थित होता. त्यानेच मेंढा येथून या रूग्ण महिलेला रूग्णालयात आणले. यावेळी त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी डॉ. नितेश वनकर हे कर्तव्यावर होते. त्यांनी सदर रूग्णाची तपासणी केली व औषधोपचार सुरू केला. त्यानंतर सदर रूग्णाची प्रकृती गंभीर वाटल्याने डॉ. वनकर यांनी दूरध्वनीवरून तज्ज्ञ डॉ. शंकर वानखेडे यांना रूग्णालयात बोलाविले. लागलीच डॉ. वानखेडे रूग्णालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल झाले व त्यांनी सदर महिला रूग्णावर औषधोपचार सुरू केला. मात्र रात्री सदर महिलेचा मृत्यू झाला व डॉ. वानखेडे यांनी सदर महिलेला १२.५० वाजता मृत घोषीत केले. औषधोपचार सुरू असतानाच मृत्यूपूर्वीच रूग्ण महिलेचा मुलगा नितेशकुमार भैसारे याने त्याच ठिकाणी कर्तव्यावर असलेले डॉ. नितेश वनकर यांना शिविगाळ करून मारहाण केली, असे डॉक्टर संघटनेचे म्हणणे आहे. त्यानंतर डॉ. वनकर यांनी गडचिरोली पोलीस ठाणे गाठून नितेशकुमार भैसारे याच्या विरोधात रात्रीच तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून पोलिसांनी नितेशकुमार भैसारे याचेवर भादंविचे कलम ३५३, ५०४, ५०६, ३३२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. राजपत्रित वैद्यकीय अधिकारी गट अ संघटनेच्या वतीने डॉक्टर मारहाण प्रकरणाचा निषेध करण्यात आला असून त्यांनी जिल्हाभर कामबंद आंदोलन पुकारले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

शुक्रवारी ९.१५ वाजतापासून ओपीडी बंद
या प्रकरणावरून डॉक्टर संघटनेने कामबंद आंदोलन शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून सुरू केले. जिल्हा सामान्य रूग्णालयातील सर्वच वैद्यकीय अधिकारी नेहमीप्रमाणे आपल्या कर्तव्यावर रूजू झाले. मात्र त्यांनी सेवेला प्रारंभ केला नाही. नेहमीप्रमाणे या रूग्णालयाच्या बाह्यरूग्ण विभागात चिठ्ठी काढण्यासाठी शेकडो रूग्णांची गर्दी झाली होती. अनेकांनी चिठ्ठ्याही काढल्या. त्यानंतर डॉक्टरांच्या तपासणी कक्षात आल्यावर हे कक्ष बंद होते. अनेक रूग्ण रूग्णालयाच्या प्रवेशद्वारासमोर औषधोपचारासाठी प्रतीक्षा करीत असल्याचे दिसून आले. चिठ्ठी काढण्याचा कक्ष सुरू होता. मात्र डॉक्टरांचे कामकाज पूर्णत: बंद होते. डॉक्टर मारहाण प्रकरणाचा रूग्णांना प्रचंड फटका बसला. शेकडो रूग्णांची गैरसोय झाली.

आरोपीस अटक झाल्याशिवाय आंदोलन मागे नाही- डॉक्टर संघटनेचा इशारा
कर्तव्यावर असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून संबंधित रूग्णावर औषधोपचार सुरू असताना सदर रूग्णाच्या नातेवाईकाने डॉक्टरला मारहाण केली. तसेच शिविगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. आमच्या तक्रारीवरून गडचिरोली पोलिसांनी आरोपी नितेशकुमार भैसारे याचेवर गुन्हा दाखल केला आहे. सदर आरोपीला पोलिसांनी तत्काळ अटक करावी, अशी मागणी करीत संबंधित आरोपीला जेव्हापर्यंत अटक होणार नाही. तेव्हापर्यंत डॉक्टरांचे कामबंद आंदोलन जिल्हाभरात सुरूच राहिल, असा इशारा शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेतून डॉक्टर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला. या पत्रकार परिषदेला डॉक्टर संघटनेचे सदस्य डॉ. नंदकिशोर माळाकोळीकर, राजपत्रित अधिकारी महासंघाचे सचिव डॉ. प्रशांत आखाडे, डॉ. नितेश वनकर, डॉ. सचिन मडावी, डॉ. मंगेश बेले, डॉ. प्रदीप मडावी आदी उपस्थित होते. जिल्हाभरातील रूग्णालयांमध्ये डॉक्टरांचे अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे कार्यरत डॉक्टरांना २४ तास सेवा द्यावी लागते. अशा परिस्थितीतही आम्ही रूग्णांची सेवा करतो. मात्र जिल्हा सामान्य रूग्णालयात डॉक्टरांना मारहाण झाल्याची घटना घडल्याने डॉक्टरांचे मनाधैर्य खचले आहे, असे डॉ. आखाडे यावेळी म्हणाले. मारहाण करणाऱ्या आरोपीला तत्काळ अटक करून कारवाई करावी, अशी मागणी जिल्हाधिकारी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक व पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांना पोलीस संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

Web Title: The doctor was abducted and beaten by a relative

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.