भीतीने नक्षल्यांना शरण जाऊ नका
By Admin | Updated: August 3, 2016 02:12 IST2016-08-03T02:12:19+5:302016-08-03T02:12:19+5:30
शिक्षण व विकासकामात अडथळे निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांना सहकार्य करू नका. शिक्षित समाज विकासाच्या दिशेने

भीतीने नक्षल्यांना शरण जाऊ नका
अभिजित फस्के यांचे आवाहन : कुरखेडात शांतता मेळाव्याचा समारोप; शहरात काढली रॅली
कुरखेडा : शिक्षण व विकासकामात अडथळे निर्माण करणाऱ्या नक्षलवाद्यांना सहकार्य करू नका. शिक्षित समाज विकासाच्या दिशेने अधिक सक्षमपणे अग्रेसर होत असतो. शिक्षणच तुमच्या विकासाची पायरी ठरू शकते. सुशिक्षित कधीच नतमस्तक होत नाही, त्यामुळे नक्षल्यांच्या भीतीपुढे शरण जाऊन भावीपिढीचे आयुष्य अंधकारमय करू नका, असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत फस्के यांनी केले.
कुरखेडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात पोलीस विभागाच्या वतीने आयोजित चार दिवसीय निवासी शांतता मेळावा प्रबोधन कार्यक्रमाच्या समारोपीय कार्यक्रमात मार्गदर्शन करताना फस्के बोलत होते. चार दिवसीय शिबिरात स्वच्छता, अंधश्रद्धा निर्मूलन, वैद्यकीय व शैक्षणिक सुविधा, जनावरांचे आजार, संगोपन, आपत्ती व्यवस्थापन, पेसा कायदा, पथनाट्य, चित्रपट योगा, क्रीडा, सांस्कृतिक माहिती, गावठी व अनैसर्गिक उपचार पद्धती, आधुनिक शेती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला तहसीलदार गुंफावार, संवर्ग विकास अधिकारी तुरकर, ठाणेदार विलास सुपे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर कटारे, वनकर, विलास घिसाडी उपस्थित होते. कार्यक्रमाला दुर्गम भागातील २२५ नागरिक उपस्थित होते. यावेळी नागरिकांना पँट, टीशर्ट व भेटवस्तू देण्यात आल्या. तसेच त्यांच्या हातावर शांततेचे प्रतीक असलेला सफेद धागा बांधण्यात आला. संचालन पीएसआय गिरी तर आभार पीएसआय कटारे यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोलीस हवालदार नरेंद्र बांबोळे व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
कुरखेडा पोलीस ठाण्याच्या वतीने मंगळवारी सकाळी ९ वाजता शहरात शांतता रॅली काढण्यात आली. मुख्य बाजारपेठ तसेच शहरातील अनेक वॉर्डांतून रॅली फिरवून जनजागृती करण्यात आली. यावेळी ठाणेदास विलास सुपे, पीएसआय कटारे, वनकर, विलास घिसाडी, शुक्ला यांच्यासह कर्मचारी व शिवाजी हायस्कूल, राणी लक्ष्मीबाई हायस्कूल, श्रीराम विद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी सहभागी झाले. (तालुका प्रतिनिधी)