बाबासाहेबांना दलितांपुरते मर्यादित ठेवू नका
By Admin | Updated: January 30, 2016 01:57 IST2016-01-30T01:57:58+5:302016-01-30T01:57:58+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकरी, कष्टकरी, ओबीसी, आदिवासी व अन्य पीडित घटकांसाठी मोठे काम केले.

बाबासाहेबांना दलितांपुरते मर्यादित ठेवू नका
गडचिरोलीत कार्यक्रम : विरा साथीदार यांचे आवाहन
गडचिरोली : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शेतकरी, कष्टकरी, ओबीसी, आदिवासी व अन्य पीडित घटकांसाठी मोठे काम केले. संविधान सभेला त्यांनी दिलेल्या निवेदनातून त्याची प्रचिती येते. मात्र बाबासाहेबांना दलितांपुरते मर्यादित ठेवण्याचे काम आपणच केले. हा प्रकार यापुढे थांबायला हवा, असे प्रतिपादन चित्रपट अभिनेते विरा साथीदार यांनी शुक्रवारी येथे केले.
सम्यक विद्यार्थी आंदोलन, बहुजन विचार मंच, एआयएसएफ व अन्य संघटनांच्या संयुक्त विद्यमाने ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व जातिअंताचा संघर्ष’ या विषयावरील चर्चासत्रात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कवी अशोक गडकरी होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर येथील पत्रकार मिलिंद कीर्ती यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना विरा साथीदार म्हणाले, उद्योगांचे राष्ट्रीयकरण, प्रत्येक माणसाचा विमा, सक्तीचे व मोफत शिक्षण या बाबींसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आग्रह धरला. त्यामागे पीडित समाजाला न्याय देण्याची भूमिका होती. यासंदर्भात बाबासाहेबांनी सविधान सभेला निवेदन दिले. परंतु प्रत्यक्षात संविधान निर्मितीमध्ये अनेक बाबींचा त्यांना समावेश करता आला नाही, असेही विरा साथीदार यांनी स्पष्ट केले.
अशोक गडकरी अध्यक्षीय भाषणात म्हणाले, बाबासाहेबांचे विचार व कार्य मोठे होते. वंचित घटकांना दिशा देण्याचे त्यांनी आयुष्यभर कार्य केले. बाबासाहेबांच्या विचारांचा व्यापक प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितले. यावेळी, डॉ.कैलाश नगराळे, प्रा.डॉ.दिलीप बारसागडे, अॅड.जगदीश मेश्राम, संदीप रहाटे, रामदास जराते,अम्ब्रिश उराडे,ओमप्रकाश टेंभूर्णे, बाळकृष्ण बाभुलकर यांनीही आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन महेश राऊत यांनी केले. याप्रसंगी माला भजगवळी यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्य व विचारावर प्रकाश टाकला. कार्यक्रमाला सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे जिल्हाध्यक्ष संदीप राहाटे, जगन जांभुळकर, यांच्यासह शहरातील नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)